Actress Puja Sawant on Ashok Kharat: राज्यभरात एकाबाजूला भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांची एकच चर्चा आहे. या प्रकरणी सर्व स्तरातून संतापाची लाट उसळलीय. कलाविश्वातून अनेक जणांनी या प्रकरणाची दखल घेत आपला संतप व्यक्त केल्यानंतर आता अभिनेत्री पूजा सावंतने या संपूर्ण भोंदूगिरीवर, अंधश्रद्धेच्या बिळात लपून महिलांवर बलात्कार करणाऱ्या अनेक भोंदूबाबा आणि गुन्हेगारीवर आपलं मत 'Abp माझा 'वर नोंदवलंय. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीने याप्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. आता अभिनेत्री पूजा सावंतने या प्रकरणावर भाष्य केलं आहे.  पूजा सावंतची प्रमुख भूमिका असणारा सालबर्डी चित्रपट आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने संवाद साधला . अंधश्रद्धेच्या, काळ्या जादूच्या प्रभावाखाली होणाऱ्या गुन्ह्यांवर एका गावात घडणाऱ्या रहस्यमयी घटनांचा पर्दाफाश करणारी भूमिका पूजा साकारतेय.

अशोक खरात प्रकरणावर काय म्हणाली पूजा सावंत?

पूजा म्हणाली " आपल्याकडे जर तात्काळ शिक्षा असेल, आपल्याकडे कुठल्याही स्त्रियांच्या बाबतीत किंवा पुरुषांच्या बाबतीत शारीरिक त्रास कोणी देत असेल तर आपल्याकडे शिक्षा कठोर असेल, गुन्हेगाराला लगेच मिळत असेल तर मला वाटतं गुन्हेगार गुन्हा करण्यापूर्वी किमान दोनवेळा तरी विचार करेल. कदाचित आत्ता जी काही संख्या आहे समाजात - मग ती बलात्काराची म्हणा किंवा या सगळ्या भोंदूगिरीची म्हणा, ती कुठेतरी कमी होईल. मनोरमा प्रधान म्हणून मी याच्याकडे बघेन की न्याय कठोर पाहिजे. म्हणजे शिक्षा कठोर असेल तर गुन्हेगारीला आळा घालता येईल. आणि पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला जसा भारत हवा आहे तसा भारत आपल्याला करता येईल " असं पूजा सावंत म्हणाली.

सालबर्डी चित्रपटाची कथा

महाराष्ट्रातील सालबर्डी गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांवर आणि त्या घटनांचं रहस्य उलगडण्यावर या चित्रपटाची कथा फिरते.या गावात अंधश्रद्धेच्या, भोंदूगिरीच्या, काळ्या जादूच्या प्रभावाखाली अनेक गुन्हेगारी रहस्यमय घटना घडतात. या घटनांचा रहस्य सोडवण्यासाठी मनोरमा प्रधानया पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येते. गावात दाखल झाल्यानंतर समोर येणाऱ्या घटना धक्कादायक वळण घेतात. या तपासाचा उलगडा करताना पूजा सावंत खाकी वर्दीत दिसते.

प्राजक्ता माळीचं अशोक खरात प्रकरणी वक्तव्य

"मी आवर्जुन उल्लेख करेल. आता महाराष्ट्रात जे काही घडत आहे, भोंदूबाबामुळे जे काही चाललेलं आहे, अतिशय संवेदनशीलतेने त्यांनी हा प्रकार हाताळला आहे. म्हणजे जिथे बापाप्रमाणे कठोर व्हायला पाहिजे, तिथे ते कठोर होतात. जिथे आईचं ममत्व पाहिजे, तिथे त्या पद्धतीनं त्या गोष्टी हाताळतात..." असं प्राजक्ता माळी म्हणालेली. तिच्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा आहे.