नांदेड : सतत गैरहजर राहत असल्यामुळे पोलीस मुख्यालयात बदली केलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयासमोरच एका रुग्णालयाच्या छतावर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले. जवळपास तासभरानंतर त्या कर्मचाऱ्याला खाली उतरवण्यास यश मिळाले.

संजय मल्हारी जोंधळे असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. सतत गैरहजर राहत असल्यामुळे काही दिवसापूर्वीच त्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली होती. त्यामुळे ते नाराज होते. त्यातच ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फटकून वागत होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांचे मानसिक स्वास्थ्यही ठीक नव्हते. मुख्यालयासमोरच डॉ. हंसराज वैद्य यांच्या रुग्णालयात ते उपचार घेत होते.

शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रुग्णालयातून ते थेट छतावर गेले. या ठिकाणी गळ्यात दोरी बांधून ते आत्महत्या करण्याची धमकी देत होते. ही बाब काही पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर डॉ. वैद्य हे जोंधळे यांना बोलण्यासाठी वर गेले, तर दुसरीकडे साध्या वेशात काही कर्मचारीही पोहचले.

डॉ. वैद्य यांच्याशी बोलण्यात गुंग असताना इतर कर्मचाऱ्यांनी झडप घालून जोंधळेंना पकडले. त्यामुळे पोलिसांसह उपस्थितांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर जोंधळे याना तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.