बीड : राज्यात 17 हजार जागांसाठी जिल्हानिहाय पोलीस भरतीची (Police) प्रकिया सुरू करण्यात आली आहे. पावसामुळे विविध जिल्ह्यात पावसाचा अंदाज घेऊन मैदानी चाचणी परीक्षा पार पडत आहे. पण, पावसामुळे शारिरीक चाचणीच्या परीक्षांवर पाणी फेरलं जात आहे. अनेक जिल्ह्यात पावसामुळे ही परीक्षा (Exam) पुढे ढकलली जात आहे. जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पोलीस भरती दरम्यान आज सायंकाळी पडलेल्या पावसामुळे बीडमधील कवायत मैदानावर पाणी साचले असून चिखलही झाला आहे. त्यामुळे, उद्या 24 जून रोजी होणारी पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी रद्द करण्यात आली आहे. तसेच, आता येत्या 1 जुलै रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
पोलीस शिपाई भरती 2022-2023 करिता उद्या 24 जून रोजी सकाळी 5.30 वा. शारीरिकक चाचणी व मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात येणार होती. त्यासाठी, एकूण 1009 मुलांना कवायत मैदान, पोलीस मुख्यालय बीड येथे बोलविण्यांत आलेले होते. मात्र, आज २३ जून रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास आणि सायंकाळी 04. वाजताच्या दरम्यान कवायत मैदानावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मैदानावर पाणी साचलेले आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे. त्यामुळे 24 जून रोजी 1009 उमेदवारांची आयोजित केलेली मैदानी चाचणी नैसर्गिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. आता, सदरची मैदानी चाचणी 01 जुलै रोजी सकाळी 05.30 वाजता निश्चीत करण्यांत आलेली आहे. तरी 24 जून रोजी पोलीस भरती 2022-23 करीता या घटकात मैदानी चाचणी असलेल्या उमेदवारांनी आता 1 जुलै रोजी सकाळी 05.30 वाजता कवायत मैदान, पोलीस मुख्यालय बीड येथे हजर राहावे, असे आवाहन बीड जिल्हा पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.