रत्नागिरी : शिवसेनेचा काल अर्थात शुक्रवारी ( 21 जून ) वर्धापनदिन साजरा केला गेला. पण, याच दिवशी शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाला रत्नागिरीतील संगमेश्वर येथे अटक करण्यात आले. चंद्रकांत उर्फ बाबा चव्हाण असं या तालुकाप्रमुखाचं नाव असून त्याने मजूर महिला आणि तिच्या पतीला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणात आता संगमेश्वर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच चंद्रकांत चव्हाण याला तात्काळ अटक देखील करण्यात आली आहे.
चंद्रकांत चव्हाण हा संगमेश्वरमधील लोवले गावचा संरपंच देखील आहे. मुळचे जळगावचे असणारे घोरपडे कुटुंब हे कामानिमित्त संगमेश्वर येथे राहतात. रस्त्यावर मजूर म्हणून हे दाम्पत्य काम करतात. यावेळी आपल्या परसातील काही काम असल्याचे सांगत चव्हाण हा घोरपडे यांच्या घराजवळ आला. यावेळी आता अंधार पडला आहे. आता उशिर झाला असून नंतर काम करतो असं उत्तर घोरपडे दाम्पत्याने दिले. त्यामुळे चंद्रकांत चव्हाण यास राग आला. त्यानंतर त्याने घोरपडे दाम्पत्याला तुमची जात कोणती? अशी विचारणा करत महिला आणि तिचा पती या दोघांना बेदम मारहाण केली. यामध्ये चंद्रकांत चव्हाण याचा मुलगा आणि पुतण्या याची देखील साथ असल्याची माहिती आता समोर येत आहे. या साऱ्या प्रकरणात आता चंद्रकांत चव्हाण विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला आता न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
वर्धापनदिन आणि उपतालुकाप्रमुखाला अटक
कालच शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. दरम्यान, याच दिवशी मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणात शिवसेनेच्या संगमेश्वर उपतालुका प्रमुखाला अटक करण्यात आली. याचीच चर्चा काल संध्याकाळापासून संगमेश्वर आणि आपसापच्या परिसरात सुरू आहे. दरम्यान, चंद्रकांत उर्फ बाबा चव्हाण याच्या विरोधात गावात देखील संताप दिसून येत आहे. अनेकांनी त्याच्या मनमानी आणि मुजोरीबद्दल संताप व्यक्त केला आहे. पण, दहशत असल्याने गावातील कुणीही नागरिक पुढे येऊन बोलण्यास धजावताना दिसत नाही. लोवले गावातील काही नागरिक देखील त्याच्या मनमानी आणि मुजोर कारभाराबद्दल आपली नाराजी बोलून दाखवत आहेत.
संबंधित बातम्या :