कोल्हापूर : कोल्हापुरात दोन ठिकाणी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. जीवबा नाना पार्क इथल्या हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील 10 ते 12 जणांच्या टोळक्याने पोलिसांवर हल्ला केला. ज्यात करवीर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकासह हवालदार जखमी झाले आहेत. हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाईसाठी गेले असता, पोलिसांवर हा हल्ला झाला. या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपींपैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.


कोल्हापूरच्या जिवबा नाना पार्क परिसरात अविनाश गवळी, अभिजित जिरगे, विलास पाटील हे तिघे मद्यधुंद अवस्थेत होते. धिंगाणा सुरु झाल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना फोन केला. पोलिस आले पण या तिघांनी पोलिसांवर हात उचलला. यामध्ये फौजदार दत्तात्रय शिंदे यांच्या हाताला मार लागला. धिंगाणा घालण्यामध्ये हे तिघेच नव्हते तर यांचे काही साथीदार देखील त्याठिकाणी होते.मात्र अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेत असून जिवबा नाना परिसरात गस्त वाढवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दुसरीकडे राजारामपुरी परिसरातही मद्यधुंद अवस्थेमधील दोघांनी वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. जनता बाजार चौकात ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केल्याने दोघांनी वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. दरम्यान, कोल्हापुरात पोलिसांवर हल्ला होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. टवाळखोरांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशांततेचं वातावरण निर्माण होतंय की काय अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

कोल्हापुरात पोलिसांवर हल्ला झाल्याची ही पहिली घटना नाही. या आधीही कारवाईसाठी गेलेले पोलिस, वाहतूक शाखेचे पोलिस यांच्यावर हल्ले झाले आहेत. अनेक टोळ्या हद्दपार झाल्या आहेत. मात्र तरीही कोल्हापूर काही शांत होण्याचं नाव घेत नाही.