बीड : परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला गीते यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाला मात्र या मतदान प्रक्रियेनंतर पोलिसांनी उर्मिला गीते यांचे पती बबन गीते यांना अटक केली आहे. जमाव बंदी असताना गर्दी का केली असे कारण या अटकेचे सांगण्यात येत आहे.


परळी पंचायत समिती हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे आणि सभापतीपदी उर्मिला गीते या काम पाहत होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी आज पंचायत समितीची विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी मतदान घेण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्य सोबतच भाजपच्या पंचायत समिती सदस्यानि सुद्धा उर्मिला गित्ते यांच्या विरोधात मतदान केलं आणि अविश्वास ठराव एक विरुद्ध दहा असा मंजूर झाला.


याच दरम्यान परळी शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या बबन गीते यांच्या घरासमोर सुद्धा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलीस आणि बबन गीते समर्थकांमध्ये बाचाबाची झाली.


बबन गित्ते यांच्या घरासमोर काहीकाळ पोलीस आणि कार्यकर्त्याचा तणाव पाहायला मिळाला. शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचे सांगत पोलिसांनी गित्ते यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर त्यांची स्कार्पिओ गाडी टोचन करून पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याने परळी शहरामध्ये तणाव निर्माण झाला आहे..


बबन गित्ते यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप ठेवून पोलिसांनी परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.. एकूण आज दिवसभर घडलेल्या परळी शहरातील घडामोडींमुळे शहरामध्ये तणाव निर्माण झाला आहे.



यासंदर्भात वरळी पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, परळी पंचायत समिती सभापतीच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल झाल्यानंतर परळीत पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केले होते.  त्यानंतर बबन गीते यांच्या घरासमोर शंभर ते दोनशे कार्यकर्त्यांची गर्दी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरासमोर जाऊन ही गर्दी पांगावण्याचा प्रयत्न केला मात्र बबन गीते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बबन गीते यांच्यासह 11 जणांना अटक केली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी पोलिसांनी झाडाझडती केली असता 2 गावठी पिस्टल 4 जिवंत काडतूस धारदार शस्त्र व लाठ्या-काठ्या सह आणि हत्यार पोलिसांनी जप्त आहेत.