PM Modi In Mumbai Navi Mumbai :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Mumbai)  यांच्या मुंबई-नवी मुंबईतील दौऱ्यात मानापमान नाट्य रंगले आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते काही प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. मात्र, या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT)  लोकप्रतिनिधींना ऐनवेळी निमंत्रण देण्यात आले आहेत. तर, ठाण्याचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांचे नाव दिघा रेल्वे स्थानक (Digha Railway Station) लोकार्पण कार्यक्रमपत्रिकेतून वगळण्यात आले आहे. दिघा रेल्वे स्थानक बांधण्यात यावे आणि सुरू व्हावे यासाठी विचारे यांनी पाठपुरावा केला होता. खासदार विचारे यांचे नाव वगळण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. 


खासदार राजन विचारे संतप्त...


ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मतदारसंघात असलेला दिघा गाव रेल्वे स्थानक आहे. त्याशिवाय, बेलापूर ते पेंधर सुरू झालेली मेट्रो प्रकल्पही त्यांच्या मतदारसंघातील आहेत. मात्र, लोकप्रतिनिधीची नावे वगळून इतर नावे टाकण्याचा कळस या सरकारने केला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे. दिघा स्टेशनसाठी आपण पाठपुरावा करून प्रकल्प कार्यान्वित केला आहे. आता त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना स्थानिक खासदार म्हणून निमंत्रण देण्याची प्रथा आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेत आपल्याला डावलले असून आजचा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा यावर प्रश्न उपस्थित होत असल्याचे खासदार राजन विचारे यांनी म्हटले.


दिघा रेल्वे स्थानक स्थानक तयार होऊन काही महिने झाले होते. मात्र, तरीदेखील त्याचे उद्घाटन करण्यात येत नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत होता. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीदेखील सातत्याने हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकार आणि भाजपवर निशाणा साधला होता. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे, राजन विचारे यांनीदेखील हा मुद्दा उपस्थित करत टीका केली होती. 



मुंबईतील ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींना डावलले 


शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांना ऐनवेळी निमंत्रण देण्यात आले. 
निमंत्रण पत्रिकेत सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांचं नाव नसल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 


ऐनवेळी निमंत्रण पाठवल्याने आणि निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या कार्यक्रमावर ठाकरे गटाच्यावतीने आता निमंत्रण येऊन सुद्धा कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. 


मुंबई शिवडी ते न्हावा शेवा या अटल सेतूचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शिवडी या भागातील आमदार अजय चौधरी आहेत. तर, खासदार अरविंद सावंत यांच्या मतदारसंघात हा भाग येतो. त्याशिवाय, या लगतच्या भागाला लागून असलेल्या वरळी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व आदित्य ठाकरे करतात. त्याशिवाय, सचिन अहिर, सुनील शिंदे हे विधान परिषदेतील आमदारही याच भागातील आहेत. यामधील काही जणांना काल रात्री तर काही जणांना आज सकाळी निमंत्रण पत्रिका मिळाल्याची माहिती आहे. 


महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पाच उद्घाटन आज होतंय यावरही सत्ताधारी शिंदे गट-भाजप राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. 


लोकप्रतिनिधी नात्याने आम्हाला MMRDA कडून मेसेज आले आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन येतायत की आज कार्यक्रमाला या, म्हणजे पूर्व नियोजित कार्यक्रम असून देखील असं केलं जातंय जाहिरात अगोदर पासून लोकप्रतिनिधींची नाव नाहीत. स्थानिक आमदार आणि खासदार यांचीही नाव नाहीत. पण रायगडच्या लोकप्रतिंधीची नाव आहेत असे ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी म्हटले.