Eknath Shinde: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.  मुंबई महापालिकेच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’च्या धर्तीवर ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी’ अभियान राबविले जाणार असून, कॅशलेस उपचारांची तरतूद अधिक व्यापक केली जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ट्विट करून संवेदना व्यक्त करत त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प केल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

Continues below advertisement

एनडीए आम्हाला योग्य मान-सन्मान देते

महायुती आणि एनडीए म्हणून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. एनडीएमध्ये आम्ही तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून, एनडीए आम्हाला योग्य मान-सन्मान देते. बाळासाहेब ठाकरे म्हणजे दिलेला शब्द पाळणारा नेता होते, आणि कलम ३७० हटवणे व राममंदिर उभारणी ही त्यांची स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली, असे ते म्हणाले. 

गडकोट प्लास्टिकमुक्त केले जातील

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, गडकोट प्लास्टिकमुक्त केले जातील. या मोहिमेंतर्गत पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय करण्यात येणार असून, शिवभक्तांच्या स्वयंसेवी संस्थांना एक लाख रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. तसेच ‘बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ अंतर्गत राज्यातील 29 महापालिका आणि 394 नगरपालिकांमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक महापालिकेला 3 कोटी तर प्रत्येक नगरपालिकेला 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. पालिका क्षेत्रातील उत्कृष्ट शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुक्रमे 10 लाख, 7 लाख आणि 3 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Continues below advertisement

महिला बचत गटांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद

महिलांसाठी विशेष तरतूद करत नगरविकास विभागामार्फत महिला बचत गटांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, मुंबई महापालिकेकडूनही महिलांसाठी स्वतंत्र तरतूद केली जाणार आहे. याशिवाय मराठी भाषा संवर्धनासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित शाळांमध्ये भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, राज्यातील दहा हजार विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच एसटीच्या माध्यमातून सवलतीच्या दरात तीर्थक्षेत्रे आणि गडकोट किल्ल्यांना तीर्थाटन घडवून आणले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

इतर महत्वाच्या बातम्या