पिंपरी- चिंचवड : एकाच रात्री घडलेल्या तोडफोडीच्या तीन घटनांनी पिंपरी चिंचवड शहर हादरलं. नेहरूनगर मधील तुफान राड्याच्या दृश्यांनी तर शहर बिहारच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली. एबीपी माझाने देखील यावर सविस्तर वृत्तांकन केलं. त्यानंतर आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश खडबडून जागे झाले. अशातच रहाटणी येथील आरोपींची धिंड काढल्याचा आजचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अशी धिंड काढली नसून तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेहल्याचा दावा वाकड पोलिसांनी केला. पण विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना धडा शिकवण्यासाठी आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचण्यासाठीच पिंपरी चिंचवड पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. म्हणूनच तोडफोडीच्या घटनांनी दहशतीत असलेल्या नागरिकांकडून देखील पोलिसांच्या भूमिकेवर समाधान व्यक्त केलं जातंय.
डॅशिंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहराची सूत्र हाती घेतल्यानंतर दिलेली तंबी गुन्हेगारांनी गांभीर्याने घेतली नाही. हे 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यानच्या वाहन तोडफोडीने सिद्ध झालं होतं. अशातच शुक्रवारी रात्री नेहरूनगर मध्ये झालेल्या तुफान राड्याचा सीसीटीव्ही समोर आला. पस्तीस दुचाकी आणि काही चारचाकीतून आलेल्या शंभर जणांच्या टोळक्याने इथं राडा घातला. नंग्या तलवारी आणि कोयते नाचवत एकावर जीवघेणा हल्ला केला, तो बचावला म्हणून धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली. यानंतर अवघ्या काही तासांत पिंपरी पोलिसांच्याच हद्दीत एका वृध्दाला मारहाण करून दोन बसची तोडफोड करण्यात आली. तर त्याच रात्री रहाटणीत आठ जणांच्या टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. तो घरात लपून बसल्याने त्याच्या घरावर आणि वाहनांवर दगडफेक करण्यात आली. एकाच रात्री घडलेल्या या तिन्ही घटनांनी शहर हादरले. घटनेला दोन दिवस उलटून ही नागरिक दहशतीत होते. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सूत्र हाती घेतल्याने गुन्हेगारीला आळा बसण्याऐवजी शहर बिहारच्या दिशेने पावलं टाकत असल्याचं चित्र यानिमित्ताने निर्माण झालं.
एबीपी माझाने तुफान राड्याचं दृश्य प्रसारित केल्यानंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ऐवजी गुंडच 'डॅशिंग' झाल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलीस आयुक्त चांगलेच खडबडून जागे झाले. आता ते या गुन्हेगारांना धडा शिकवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्याचवेळी सोशल मीडियावर रहाटणी येथील आरोपींचा आजचा फोटो व्हायरल झाला. वाकड पोलिसांनी या सहा आरोपींचं टक्कल करून त्यांची धिंड काढली होती. या आरोपींना धडा शिकवण्यासाठी, तसेच अशा प्रवृत्तींना ठेवण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली. नागरिकांच्या चर्चेत समाधान व्यक्त होत असताना पोलिसांचं कौतुक ही दिसून आलं. वाकड पोलिसांना याबाबत विचारलं असता आरोपींना चौकशीसाठी तिथं नेल्याच सांगण्यात आलं. त्यावेळी तिथून दोन कोयते आणि गुन्ह्यात वापरलेली वाहन जप्त करण्यात आली. घटनास्थळी निमुळता रस्ता असल्याने तिथं चारचाकी वाहन जात नव्हतं. त्यामुळे आरोपींना पायी चालवत घटनास्थळी आणावे लागले, तेंव्हा उपस्थित नागरिकांनी याचे फोटो काढून ते व्हायरल केले असावेत. असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं.