Rohit Arya Encounter: मुंबईतील पवई परिसरातील रा स्टुडिओमध्ये 17 मुलांसह 19 जणांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य नावाचा 50 वर्षीय युट्यूबर चकमकीत ठार झाला. क्विक रिस्पॉन्स टीमच्या आठ कमांडोंनी 35 मिनिटांत सर्व मुलांना वाचवले. आरोपीने 10 ते 15 वयोगटातील 100 मुलांना एका वेब सिरीजच्या ऑडिशन्ससाठी बोलावले होते. ऑडिशन्स दोन दिवस चालणार होते. ऑडिशन्स दरम्यान, त्याने 17 मुलांना एका खोलीत बंद केले. त्यांना ओलीस ठेवल्यानंतर, आर्यने एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये तो दहशतवादी नसल्याचे म्हटले होते. जर त्याला काही झाले तर मुलांना इजा करण्याची धमकी त्याने दिली. दुपारी पावणे दोनच्या सुमारास मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर कमांडो आणि पोलिसांनी स्टुडिओला वेढा घातला. पोलिसांनी बाथरूममधून स्टुडिओमध्ये प्रवेश केला. या चकमकीदरम्यान रोहितने पोलिस पथकावर एअर गनने हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये आर्य जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे संध्याकाळी सव्वा पाच वाजता त्याचा मृत्यू झाला. रोहित पुण्याचा रहिवासी होता. तो आरए स्टुडिओमध्ये ऑडिशन्स घेत होता आणि एक यूट्यूब चॅनल देखील चालवत असे.
रोहित आर्य ठार, दीपक केसरकर चर्चेत
दरम्यान, रोहितचा खात्मा झाल्यानंतर त्याने शिक्षण विभागासाठी एक उपक्रम राबवल्याचे समोर आले. या उपक्रमातील 2 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने तो पैसे मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने आंदोलन, उपोषणाचा सुद्धा मार्ग अवलंबला होता, अशी माहिती समोर आली. दुसरीकडे, आता रोहित आर्यसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत दिसत आहेत. यामध्ये व्यासपीठावर रोहित आर्य सुद्धा आहे.
फोटो शेअर करत काय म्हटलं आहे?
23 ऑगस्ट 2023 रोजी केलेल्या ट्विटमध्ये दीपक केसरकर म्हणतात, शालेय शिक्षण विभागाच्या ‘लेट्स चेंज’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ अभियानाचा मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या अभियानांतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनविण्यात आले असून हे विद्यार्थी स्वच्छतेच्या बाबतीत आमूलाग्र क्रांती घडवतील, असा विश्वास याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केला. निष्काळजी मुक्त महाराष्ट्र हे उद्दिष्ट ठेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या संकल्पनेतून स्वच्छ सुंदर महाराष्ट्र घडेल. आरोग्य विषयी विविध समस्यांबाबत जागृती होईल. स्वच्छता हा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असून ‘लेट्स चेंज’ उपक्रमात ६४ हजार शाळांमधील ३८ लाख विद्यार्थी सहभागी होत आहेत. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, ‘लेट्स चेंज’ उपक्रमाचे संचालक रोहित आर्या यांच्यासह ‘स्वच्छता मॉनिटर’ विद्यार्थी उपस्थित होते. या ट्विटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांना टॅग केलं आहे.
दुसरीकडे, दीपक केसरकर यांनी सांगितले की, शिक्षणमंत्री असताना त्यांनी रोहित आर्य यांना चेकद्वारे वैयक्तिकरित्या पैसे दिले होते. रोहित आर्य 'माझी शाळा सुंदर शाळा' योजनेशी संबंधित होते. रोहितने त्यांच्या घराबाहेर उपोषणही केले. केसरकर यांनी पुढे म्हटले की, कोणत्याही सरकारी देयकासाठी सर्व प्रक्रियांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे त्यांना 2 कोटी रुपये मिळाले नाहीत हा त्यांचा आरोप खोटा आहे. त्यांनी विभागात जाऊन कागदपत्रे सादर करावीत.
इतर महत्वाच्या बातम्या