Sharad Pawar : शरद पवारांवर पीएचडी पूर्ण, मात्र स्वभावाचं गूढ कायम, काय म्हणतोय संशोधक?
गेल्या 50 वर्षात शरद पवार (Sharad Pawar) नेमके कसे आहेत? हे कोणालाच कळले नसून त्यांच्या मनाचा थांगपत्ता कधीच लागत नसल्याने त्यांची अतिशय हुशार मात्र गूढ असे व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे.

पंढरपूर : शरद पवार उर्फ साहेब... हे नाव गेली 5 दशके महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात कायम चर्चेत राहणारे नाव आहे. काहीही घडले तरी याच्यामागे साहेबांचा हात अशी नेहमीच चर्चा सुरु असते . मात्र गेल्या 50 वर्षात शरद पवार नेमके कसे आहेत हे कोणालाच कळले नसून त्यांच्या मनाचा थांगपत्ता कधीच लागत नसल्याने त्यांची अतिशय हुशार मात्र गूढ असे व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे . पवार साहेबांकडून अनेकवेळा तोंडावर पडावे लागल्याचे सर्वात जास्त दुःख भाजप नेत्यांना असते आणि म्हणूनच चंद्रकांत पाटील हे त्यांचेवर पीएचडी करण्याची इच्छा नेहमी बोलून दाखवत असतात . मात्र चंद्रकांत पाटील यांच्या आधी एका पट्ठ्याने हि कामगिरी केली असून शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या "आदरणीय शरद पवार साहेब आणि महाराष्ट्रातील पुरोगामी लोकशाही दलाचे शासन , एक चिकित्सक अभ्यास..." या प्रबंधाला पीएचडी दिली आहे .
सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथील डॉ. प्रा. दत्तात्रय काळेल यांनी सहा वर्षाच्या सखोल अभ्यासातून हा प्रबंध सादर केला आहे. डॉ. काळेल हे पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आहे. या प्रबंधाबाबत आता दाखल घ्यायचे कारण 1978 साली शरद पवार यांनी महाराष्ट्रात असाच चमत्कार करून पुरोगामी लोकशाही दलाचे अर्थात पुलोदचे शासन आणले होते आणि आज 42 वर्षानंतर 2020 साली देखील पवार यांनी असाच चमत्कार घडवत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र करीत राज्यात लोकशाही आघाडीचे सरकार आणून दाखवले आहे. हा प्रबंध लिहिताना डॉ काळेल यांनी पवार यांचे ज्येष्ठ सहकारी गणपतराव देशमुख , एन. डी. पाटील, सुधाकरपंत परिचारक यांच्या सारख्या ज्येष्ठांसह सुप्रिया सुळे, सुनील तटकरे , रोहित पाटील यांच्या सारख्या तरूणांशीही चर्चा केली होती. यासाठी काळेल यांनी दोनवेळा थेट शरद पवार यांची भेट घेऊनही चर्चा केली आणि हा प्रबंध तयार झाला.
पुलोद सरकारच्या निर्मितीबाबत अनेकांच्या मनात गैरसमज असून मी केवळ तत्कालीन परिस्थिती आणि महाराष्ट्र हिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे पवार यांनी डॉ काळेल यांना सांगितले होते. जे लिहिताय ते वास्तव लिहा ज्यामुळे पुलोद बद्दल आजही काहींच्या मनात जे गैरसमज आहेत ते दूर होण्यास मदत होईल असा सल्ला देखील पवार यांनी दिल्याचे डॉ काळेल सांगतात. शरद पवार यांच्यावर पीएचडी करताना त्यांच्या स्वभावाचे कोणते अंतरंग उलगडले याबाबत काळेल यांना नीट सांगता येत नसले तरी जे सर्वसामान्यांना माहित आहेत तेच स्वभाव विशेष काळेल सांगतात . मात्र पवार यांच्या गूढ स्वभावाबाबत असलेले कोडे त्यांचे अंतरंग अभ्यासताना डॉ. काळेल यांनाही उलगडलेले नाही त्यामुळे चंद्रकांत दादा आणि इतर अभ्यासकांना पवार साहेबांच्या या गुणांवर पीएचडी करायची नक्की संधी आहे .
























