Petrol Shortage Update: सध्या विविध शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलसाठी होत असलेली गर्दी, तसेच काही पंप कोरडे पडल्याचे जे चित्र पाहायला मिळत आहे, त्यामागे पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांकडून घेण्यात येणाऱ्या पेमेंट पद्धतीमध्ये केलेले बदल कारणीभूत आहे का? पेमेंट पद्धतीतील बदलांमुळेच पेट्रोल पंपांवर पेट्रोलियम कंपन्यांकडून पोहोचणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या (Petrol Shortage) टँकर्सला उशीर होत आहे का? आणि खरंच पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे का? याचे उत्तर आता खुद्द महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (Maharashtra Petrol Pump Dealers Association) अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दिले आहेत. (No fuel shortage in India)

Petrol Shortage : पेट्रोल डीलर्सकडून घेण्यात येणाऱ्या पेमेंट पद्धतीमध्ये बदल

गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी पेट्रोल डीलर्सकडून घेण्यात येणाऱ्या पेमेंट पद्धतीमध्ये बदल केलेत. आधी सर्व पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डीलर्सला काही तासांपासून एका दिवसाच्या क्रेडिटवर म्हणजेच उसनवारीवर पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करत होती. मात्र आता सर्वच कंपन्यांनी ॲडव्हान्स पेमेंटची अट घातली आहे. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांकडून आरटीजीएसच्या माध्यमातून पेट्रोलियम कंपन्यांच्या खात्यात ॲडव्हान्स पैसे टाकल्यानंतर ते पेट्रोलियम कंपन्यांच्या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होण्यासाठी (बँकिंग यंत्रणेची दिरंगाई) काही वेळ जातोय. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या होणाऱ्या पुरवठाची वेळ वाढली आहे.

क्रेडिट लिमिटचा बदललेला नियम, पेसोने सुरक्षित वाहतूकसाठी आखलेले नियम कारणीभूत

यासोबतच, पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन म्हणजे पेसोने रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करू नये, असे नियम केले आहे. त्यामुळे दिवसभरात पेट्रोल पंप संचालकांकडून पेट्रोलियम कंपन्यांना ऍडव्हान्स पेमेंट करण्यात आले आणि रात्रीपर्यंत जरी ते पेट्रोलियम कंपन्यांच्या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट झाले, तरी रात्री 11 ते पहाटे 5 दरम्यान पेट्रोलियम कंपन्या पेट्रोलचा टँकर पाठवू शकत नाही. त्यामुळे क्रेडिट लिमिटचा बदललेला नियम आणि पेसो ने सुरक्षित वाहतूकसाठी आखलेले नियम यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यामध्ये काहीसा जास्त वेळ लागत असल्याची माहिती अमित गुप्ता यांनी दिली.

पेट्रोल आणि डिझेलचा कुठेही तुटवडा नाही, लोकांनी घाबरून जास्त खरेदी करू नये (Maharashtra Petrol Pump Dealers Association) 

दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचा कुठेही तुटवडा नाही. लोकांनी घाबरून जास्त खरेदी करू नये, पेट्रोल डिझेलचा साठा करू नये, सर्वांना पेट्रोल आणि डिझेल मिळेल, असा आश्वासनही अमित गुप्ता यांनी दिला आहे.