Petrol Diesel : अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्यामुळं पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या बुलढाणा आणि परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणच पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी सुरु आहेत. ज्या ठिकाणी पेट्रोल पंप सुरु आहेत, त्या ठिकाणी वाहनांच्या मोठं मोठ्या रांगा असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
पेट्रोल व डिझेलच्या उपलब्धतेवरून तणावपूर्ण परिस्थिती
बुलढाणा जिल्ह्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या उपलब्धतेवरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण 166 पेट्रोल पंप असताना, त्यापैकी अनेक पंपांवर इंधनाचा साठा संपल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे, त्या पेट्रोल पंपांवर तब्बल 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनचालक सकाळपासूनच रांगेत उभे राहत असल्याने वाहतूक व्यवस्थेवरही ताण पडत आहे. दरम्यान, इंधन तुटवड्याबाबत विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेत, “अफवांवर विश्वास ठेवू नका, इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे आवाहन केले आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, प्रशासनाचं आवाहन
नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र शहरीसह ग्रामीण भागात पेट्रोल पंपावर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने हाहाकार उडाला आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉ. संजय महाजन यांनी
परभणी शहरातील 5 पैकी 4 पेट्रोल पंप बंद, एकाच ठिकाणी पेट्रोल
पेट्रोल डिझेल मिळणार नाही या अफेवेने परभणीकरांनी मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेल भरून घेतल्याने पुन्हा एकदा परभणी शहरातील पेट्रोल पंपांवरील इंधन पूर्णतः संपले आहे. शहरात असलेल्या पाच पैकी चार पंपाना इंधन नसल्याने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. एकाच ठिकाणी पेट्रोल शिल्लक राहिले आहे. त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर परभणीकरांनी गर्दी केली आहे. जवळपास 200 दुचाकी या पंपावर सध्या रांगेत आहे. सर्वजण पेट्रोल भरुन घेण्याची घाई करत आहेत. प्रशासनाकडून इंधनाचा पुरेसा साठा असून नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, तरीही गर्दी होत आहे. यामुळं आजपासून जिल्ह्यात दुचाकीला 200 व चारचाकी ला दोन हजार रुपयांचे पेट्रोल भरण्याची मर्यादा लावण्यात आली आहे. तरीही गर्दी कमी व्हायला तयार नाही.