नागपूर : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर नागपुरात विधानभवनात भाजप आमदारांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांनी जल्लोष केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जे विकासाचं आणि विश्वासाचं राजकारण केलं आहे. त्याला जनतेने पाठिंबा देत त्यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हिमाचल आणि गुजरातमधील जनतेचे त्यांनी आभारही मानले.

हिमाचल प्रदेशात भाजपने काँग्रेसकडे असलेली सत्ता मोठ्या फरकाने खेचून आणली आहे. अत्यंच चुरशीच्या बनलेल्या गुजरातमध्ये भाजपने बहुमतापेक्षाही जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर सुरुवातीला मुसंडी मारलेल्या काँग्रेसची नंतरच्या फेरीमध्ये पिछेहाट झाली. पंतप्रधान मोदींसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. तर काँग्रेसनेही संपूर्ण ताकद पणाला लावली होती.

मोदींकडून जनतेचे आभार

सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला जनतेचा पाठिंबा असल्याचं गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालातून समोर आलं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील जनतेनेच मोदींनी आभारही मानले. विकासाचा हा प्रवास असाच सुरु राहिल. दोन्ही राज्यातील जनतेची अविरतपणे सेवा करु, असं आश्वासन मोदींनी दिलं. ट्वीट करुन मोदींनी जनतेचे आभार मानले.