नाशिक : रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाच्या रुममधून उडी घेत, रुग्णाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक विभागातील मुख्य शासकीय रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या संदर्भ सेवा रुग्णालयात हा प्रकार घडला.
देवळाली कॅम्प परिसरातील रहिवासी किसन पटोले यांना चार दिवसांपूर्वी दम्याचा त्रास होऊ लागला. ते तातडीने संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी खिडकीतून खाली उडी मारली आणि आत्महत्या केली.
काही वर्षांपूर्वी मृत पटोले यांच्यावर बायपासची शस्त्रक्रिया झाली होती आणि आता दम्याच्या आजारपणामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, आजारपणाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.
या घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रशचिन्ह निर्माण झाला आहे.