पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पूरग्रस्तांना पाच कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच भाविकांनी अंबाबाईला नेसवलेल्या पाच हजार साड्याही महिलांना देण्यात येणार आहेत. शिवाय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचीही वेगळी तरतूद करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितलं आहे. देवस्थान समितीचे कर्मचारी एक दिवसांचा पगार देखील पूरग्रस्तांसाठी देणार आहेत.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पूरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री निधीत ही रक्कम जमा करण्यात आली. तसेच, 'लालबागचा राजा'चे मंडळ रायगडमधील जुई गावच्या धर्तीवर एक संपूर्ण गाव दत्तक घेऊन त्या गावाचे पुनर्वसन करणार आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सांगली, कोल्हापूर परिसरात महापूरानं थैमान घातलं आहे. लाखो लोकांना या महापुरामुळे विस्थापित व्हावं लागलं आहे. या महापुरामुळे करोडो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे यंदा या मंडळांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.