Parrot Crop Damage: मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. एका शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याचे आदेश खंडपीठाने फडणवीस सरकारला दिले आहेत. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी महादेव डेकाटे यांच्या डाळिंबाच्या बागेचे पोपटांमुळे नुकसान झाले होते. या प्रकरणी शेतकऱ्याने तब्बल 10 वर्षे कायदेशीर लढा दिला. अखेर, नागपूर खंडपीठाने याप्रकरणी ऐतिहासिक निकाल देत पोपटांनी केलेल्या डाळिंबाच्या बागेच्या नुकसानीची भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

Continues below advertisement

Parrot Crop Damage: नेमके प्रकरण काय?

वर्धा जिल्ह्यातील हिंगी गावचे 70 वर्षीय शेतकरी महादेव डेकाटे यांच्या डाळिंबाच्या बागेवर मे 2016 मध्ये जवळच्या वन्यजीव अभयारण्यातून आलेल्या रानटी पोपटांनी हल्ला केला होता. या पोपटांनी बागेतील सुमारे 200 झाडांवरील डाळिंबांचा अक्षरशः फडशा पाडला होता. डेकाटे यांनी या नुकसानीबद्दल सरकारकडे भरपाई मागितली होती, परंतु सरकारने तांत्रिक कारणे देत ती नाकारली होती.

Parrot Crop Damage: राज्य सरकारचा 'अजब' युक्तिवाद 

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने कोर्टात असा युक्तिवाद केला की, शासनाच्या नियमानुसार केवळ 'रानटी हत्ती' किंवा 'रानटी गवे' यांनी फळबागांचे नुकसान केल्यास भरपाई दिली जाते. पोपटांनी केलेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याची कोणतीही तरतूद शासन निर्णयात (GR) नाही, असा दावा सरकारने केला होता.

Continues below advertisement

Parrot Crop Damage: हायकोर्टाचा निकाल 

न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने सरकारचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. "वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पोपट हा 'वन्यजीव' श्रेणीत येतो. जर संरक्षित प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिली नाही, तर शेतकरी वन्यजीवांना हानी पोहोचवणारे मार्ग अवलंबतील, ज्यामुळे कायद्याचा मूळ उद्देशच धोक्यात येईल," असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.

Parrot Crop Damage: राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश 

या प्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिले आहेत की, महादेव डेकाटे यांच्या 200 झाडांच्या नुकसानीसाठी प्रत्येक झाडामागे 200 रुपये याप्रमाणे भरपाई देण्यात यावी. 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शेतकऱ्याचा हा विजय राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठीही आशेचा किरण ठरला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

KEM Hospital: केईएम रुग्णालयाच्या नामांतरावरुन ठाकरेंचा आमदार भडकला, म्हणाला, 'मराठीजनांनो, मुंबई तुमच्या हातात राहिलेय का, ती तर लोढाची झालेय'

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: नीलम गोऱ्हे , बच्चू कडू नको...; विधान परिषदेसाठी 'त्यांना' संधी द्या, शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं!