Parbhani News : परभणीच्या (Parbhani) लोअर दुधना प्रकल्पाचा मुख्य कालवा पावसाच्या पाण्याने भरला आणि ओव्हर फ्लो होवून 4 ठिकाणी फुटल्याची घटना घडली आहे. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. डिग्रस गोकुळवाडी, मांडवा, नंदापूर या गावच्या शिवारात हा प्रकार घडला आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झालं आहे. 

Continues below advertisement

नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत देण्याची मागणी 

दरम्यान, अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांनी आज भर पावसात या परिसराची पाहणी केली आहे. लोअर दुधना प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी फोनवरुन संवाद साधत कालवा कामात केलेल्या हलगर्जीपणाचा जाब विचारत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

मुंबईसह राज्यभरात दमदार पावसाची हजेरी

गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा मुहूर्त साधत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबईसह राज्यभरात दमदार पाऊस झाल्याचं दिसून आलं. राज्यातील अनेक ठिकाणी, नद्यांना पूर आला असून नाले, ओढे भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी मुंबईतही आज मध्यरात्रीपासूनच पावसाची धुव्वादार बॅटिंग पाहायला मिळाली. भारतीय हवामान खात्याने (IMD forecast) विदर्भ, मराठवाडा, कोकणसह, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा दिला आहे. तसेच, उद्या संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट असेल, तर पुढील काही दिवस कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला असल्याची माहिती केंद्रपमुख शुभांगी भुते यांनी दिली.

Continues below advertisement

दमदार पावसामुळे अनेक नदी-नाले ओसंडून वाहू लागले

गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे. तर धरणसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. या पावसाचा काही ठिकाणी फायदा झाला आहे. तर काही ठिकाणी मात्र या पावसाने बळीराजाचं मोठं नुकसान केलं आहे. दरम्यान, संभाव्य पावसाचा इशारा लक्ष्यात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबईसह कोकणातही दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र असून सोबतच, पूर्व पश्चिम ट्रफ तयार झालाय.  त्या पार्श्वभूमीवर आज कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

मुंबईत रेड अलर्ट, कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज, अलर्ट जारी