मुंबई : पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या नावासमोर कमळाचं चिन्ह किंवा भाजप लिहिणे टाळले आहे. त्यांनी अटल बिहारी वाजपेयींना केलेले अभिवादन आणि नाताळच्या शुभेच्छांमध्ये कोठेही भाजपचा उल्लेख नसून केवळ पंकजा गोपीनाथ मुंडे एवढाच उल्लेख केला आहे. त्यामुळे हे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या दिशेने आणखी एक पाऊल मानले जात आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतिदिनी आपण आता भाजपच्या कोअर कमिटीत नाही, असे सांगुन यापुढे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज केलेल्या दोन्ही ट्विट मध्ये भाजपचा उल्लेख त्यांनी टाळला आहे. यातील एक ट्विट माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना अभिवादन करणारे तर दुसरे नाताळानिमीत्त शुभेच्छा देणारे आहे.


भाजप पक्ष मी सोडणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी आपल्य भाषणातून ठासून सांगितलं. तसंच 27 जानेवारीला औरंगाबादमध्ये उपोषण करणार असून त्यानंतर राज्यभर मशाल दौरा करणार असल्याचा निश्चय पंकजांनी केलाय. सोबतच कोअर कमिटीतून मला मुक्त करा, असं आवाहनच पंकजांनी केलंय. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या जन्मदिनानिमित्त परळीत पार पडलेल्या मेळाव्यात त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे गोपीनाथगडावरील मेळाव्याच्या व्यासपीठावरुन भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे.

येत्या 26 तारखेपासून पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्यभर आपला दौरा करणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर दीड महिन्यांनी पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात परतल्या होत्या. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी मोठे शक्तिप्रदर्शन करत पंकजा मुंडे यांनी आपल्या पुढील राजकारणाची दिशा ठरवली आहे. त्यामुळे आगामी काळात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून त्यांचे राज्य भर दौरा काढणार आहेत. या सोबतच भाजपाची भूमिका नेमकी कशी असणार आहे पाहणेसुद्धा मोठ औत्सुक्याचे असणार आहे.

संबंधित बातम्या : 

मी कुठेही गेलेलो नाही, अजूनही राष्ट्रवादीमध्येच : विजयसिंह मोहिते पाटील