Pankaja Munde on Unseasonal Rains Beed : राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसासह गारपीट होत असल्यानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. विषेशत: फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी, असे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
बीड, आष्टी, वडवणी, केज तालुक्यात अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यात बीड, आष्टी, वडवणी, केज तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीची मंत्री पंकजा मुंडे यांनी माहिती घेतली. यामध्ये फळबागांसह पिकांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.
धुळे शहर जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस आणि गारपीट
संपूर्ण राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. धुळे शहर जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. साखरी तालुका आणि शिंदखेडा तालुक्यात गारपीट झाल्याने काढलेला पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असून वादळी वाऱ्यामुळं मात्र पिके झोपून गेली आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे वातावरणात बदल झाला असून यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती देखील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यात गारपीट झाली आहे. यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर व खामगाव तालुक्यातील अनेक परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला तर काही भागात तुरळक प्रमाणात गारपीट देखील झाली. दुपारच्या सुमारास चिखली शहर परिसरात अचानक झालेल्या गारपिटीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांची मात्र धावपळ उडाली अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांदा या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.