बीड : नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाच्या कामाचा 377 कोटी रूपयांचा निधी सध्या राज्य सरकारकडे थकीत आहे. बीड जिल्हयाच्या सुपरफास्ट विकासात मानाचा तुरा असणा-या या रेल्वेच्या कामाकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष, ही तर बीडच्या विकासाला खीळ आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग जिल्हयातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे ते स्वप्न होते. या रेल्वेमार्गासाठी केंद्र आणि राज्याने अर्धा अर्धा वाटा देण्याचे प्रस्तावित आहे. केंद्र सरकारने आपल्या वाट्याचा निधी प्रकल्पाला दिला आहे, त्या निधीतून सध्या काम सुरू आहे, परंतु राज्य सरकारकडे या प्रकल्पाचा सन 2019-20 या आर्थिक वर्षांचा 228 कोटी आणि सन 2020-21 मधील 149 कोटी असा एकूण 377 कोटी रुपयांचा निधी थकीत आहे, असे खासदार प्रितम मुंडे यांनी रेल्वे अधिका-यांच्या घेतलेल्या व्हर्चुअल आढावा बैठकीतून उघड झाले आहे.
राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे गेल्या वर्षभरापासून हा निधी रेल्वे प्रकल्पाला मिळाला नाही. त्यामुळे प्रकल्प रखडण्याची भिती आहे, असे होणे जिल्हयाच्या प्रगतीला फार मोठा अडथळा असून विकासाला खीळ बसणार आहे. सरकारने त्यांच्या वाट्याचा थकीत 377 कोटीचा निधी तातडीने द्यावा तसेच या विषयावर संबंधित जिल्हयाचे खासदार व पालकमंत्र्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घ्यावा अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवले आल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे
Suresh Dhas | उसतोड कामगारांना मजुरीत 150 टक्के वाढ द्या, नाहीतर... - सुरेश धस