पुणे : संभाजी भिडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना यावेळी देखील पोलिसांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या समोर चालण्यास परवानगी नाकारली आहे. पालखी सोहळा समितीच्या वतीने यावेळी देखील पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे. या पत्रात पालखी सोहळ्यात कोणालाही घुसू देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.


परंपरागत पद्धतीने चालत आलेला दिंड्यांचा क्रम कायम राहावा, असं मत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी पुन्हा एकदा मांडलं आहे. त्यानंतर पोलिसांनी भिडे गुरुजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखी सोहळ्याच्या पुढे चालता येणार नाही हे स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे उद्या संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांचे समर्थक पुण्यातील जंगली महाराज मंदीरात जमतील आणि सर्व पालख्या पुढं गेल्यावर सोहळ्यात सहभागी होऊन शिवाजी नगर चौक ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालत जातील.

पुण्यात ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत अडथळा आणल्याप्रकरणी गेल्यावर्षी सुमारे एक हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पुण्यातील गुडलक चौकात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात वादावादी झाली होती.

फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले होते. यापैकी काहीजणांकडे तलवारीही होत्या. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ पालखी सोहळा तब्बल अर्धा तास रोखण्यात आला होता. त्यामुळे माऊलींच्या पालखीला पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला विलंब झाला होता.

पुण्यात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या आल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे असते. त्यानंतर जबरसेठ वाणी महाराजांची पालखी असते. त्या पाठोपाठ संताजी महाराज जगनाडे यांची पालखी असते आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असते.

मात्र गेली काही वर्षे संभाजी भिडे गुरुजींच्या संघटनेतील लोक ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये घुसतात. गेल्या वर्षी भिडे गुरुजी संघटनामधील काही व्यक्तींच्या हातामध्ये तलवारी आणि डोक्याला फेटे घालत प्रवेश केला होता. यावरुन मोठा गोंधळ झाला होता. यामुळे पालखी सोहळा समितीच्या वतीने यावेळी देखील पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे.