पंढरपूर : राज्यात आणि देशात कोरोनाचा कहर सुरु असताना आजपासून देऊळबंद असलेल्या विठुरायाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात झाली आहे. वैशाख वणव्याची दाहकता चैत्रातच जाणवू लागली असताना आणि मधूनच अवकाळीचा दणका बसत असताना मंदिर समितीने परंपरेनुसार आजपासून विठुरायाच्या चंदन उटी पूजेची सुरुवात केली. मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याहस्ते सपत्नीक पहिली चंदन उटी पूजा पार पडली. आता तीन महिने तीव्र उन्हाळ्याचा काळ असल्याने विठुरायाला या उष्म्यापासून दिलासा मिळावा यासाठी शीतल अशा चंदनाचा लेप संपूर्ण अंगाला लावण्यात येत असतो.
यासाठी खास म्हैसूर येथून उच्च दर्जाचे चंदन मागवण्यात येत असते. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत हा चंदनउटीची पूजा होत असते. विठुरायाच्या पोषाखाच्यावेळी आता रोज ही पूजा होणार असून देवाच्या अंगावर अंगी घालण्याऐवजी चंदनाचा लेप देण्यास सुरुवात झाली आहे.
विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली. भाविकांच्या हस्ते दरवर्षी ही चंदन उटी पूजा होत असते मात्र सध्या कोरोनामुळे भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने आता ही चंदनउटी पूजा मंदिर व्यवस्थापनाकडूनच केली जाणार आहे.
देवाच्या रोजच्या चंदन उटी पूजेसाठी 750 ग्राम उगाळलेले चंदनाची आवश्यकता असते यात केशर मिसळण्यात येते. विठुरायाला रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकडा आरतीच्यावेळी काढण्यात येते.