पंढरपूर : एकाबाजूला कोरोनाचा संकटरुपी यमराज आ वासून उभा असताना दुसऱ्या बाजूला सर्व नियम पायदळी तुडवत सुरु असलेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावल्या. गेले काही दिवस कोरोना काळात हजारोंच्या उपस्थितीत प्रचारसभा राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून घेत आपली संपूर्ण ताकद लावायचा प्रयत्न झाला आहे. आज अखेरच्या दिवशी मात्र भाजपने एकही सभा न घेता दिलासा दिला असला तरी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवेढ्यात शेवटच्या प्रचारसभा घेतल्या. दोन्ही पक्षांची ताकद पणाला लागली असल्याने येथील प्रचारातही एकमेकांवर बरेच तोंडसुख घेण्यात आले. असे असले तरी ही निवडणूक दोन्ही पक्षाला सोपी नसून अतिशय काट्याची टक्कर होणार असे चित्र दिसत आहे.
 
अजित पवार यांनी केलेल्या टीकेला आज चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देताना सिंचन घोटाळ्याची आठवण करून देत जास्त गमजा करू नका असे सुनावले होते. आज सायंकाळी मंगळवेढ्याच्या सभेत बोलताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे शेतकरी वाटतात का? अशा शब्दात त्यांना पुन्हा  डिवचले. तर मंगळवेढ्याच्या सभेला येण्यापूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी थेट जतपर्यंत फिरून मंगळवेढ्याला कसे पाणी देता येईल याचा अभ्यास करून भाषणात पाणी देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दाखवले. 


मतदारांना आकर्षित करण्याचा असा प्रयत्न दोन्ही बाजूने झाला असला तरी वर्षानुवर्षे पाण्यासाठी वणवण करणारी जनता मते कोणाला देणार हे आता 17 एप्रिल रोजी मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे.  या निवडणुकीत राष्ट्रवादीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांचा मोठा फटका बसणार आहे.


यासोबत वंचित बहुजन आघाडी व इतर काही पुरोगामी पक्षांकडून राष्ट्रवादीला कात्री बसू शकते. भाजपचे उमेदवार समाधान अवताडे याना त्यांचा चुलत भाऊ सिद्धेश्वर अवताडे यांचा मोठा फटका मंगळवेढ्यात बसणार असून ही मते थेट समाधान अवताडे यांच्या मतांतून वजा होणार आहेत. या सर्व साठमारीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांना वडिलांच्या निधनाची सहानुभूती मिळणार असून समाधान अवताडे यांना मंगळवेढ्यात भूमीपुत्र असल्याचा लाभ होणार आहे.  या निवडणूक प्रचारात अजित पवार चक्क चार दिवस एका मतदारसंघात तळ ठोकून राहिल्याने या निवडणुकीची सर्व सूत्रे अजित पवार आणि जयंत पाटील यांचेकडे राहिली होती.


ज्या बारामती या अजित पवारांच्या मतदारसंघात ते केवळ एक शेवटची सभा घेतात ते अजित पवार या निवडणुकीत गावोगावी जात नेत्यांच्या गाठीभेटीवर जास्त भर दिला आणि त्यामुळेच अनेक नेत्यांना त्यांनी राष्ट्रवादीत आणून भगिरथ भालके यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या बाजूने धनगर नेते गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे यांनी राष्ट्रवादीला जेरीस आणत त्यांचा मोठा मतदार फोडण्याचे काम केले. आता अजित पवार जयंत पाटील यांनी उभी केलेली ताकद सरस ठरणार कि देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी उभी केलेली ताकद सर्रास ठरणार हे 2 मे च्या निकालात दिसून येणार आहे.