Pandharpur Ashadhi Wari 2021 : पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे. आषाढीला पालख्या बसमधूनच येणार असल्याचं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून एकादशी दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे.  यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात शासन आदेश निघाला असून पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे. 


मानाच्या 10 पालखी सोहळ्यांच्या प्रस्थान सोहळ्याबाबत शासनाच्या आदेशात म्हटलं आहे की, देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 तर उर्वरित 8 सोहळ्यांसाठी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल. 


मानाचे पालखी सोहळे प्रस्थान ठिकाणाहून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किमी अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्यात परवानगी देण्यात आली आहे. 


यंदाच्या वर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होईल तप पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 


शासकीय महापूजा, विठ्ठलाशी संतांच्या भेटी गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार आहे. तर नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. 


एकादशी दिवशीचा रथोत्सवासाठी रथाऐवजी स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी आणि मंदिर समितीचे 5 कर्मचारी असे 15 व्यक्ती येतील. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल. 


संताच्या पादुका भेटीदरम्यान मानाच्या पालखी सोहळ्यातील 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर वारीसाठीच्या 2 बसमध्ये प्रत्येकी 20 असे 40 वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. 








 संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. राज्यभरातून निघणाऱ्या पालख्यांमधे संत मुक्ताईची पालखी ही पहिल्यांदा पंढरपूरकडे प्रस्थान करत असते. आज आषाढी पंचमी निमित्ताने ही पालखी प्रस्थान करत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी काढण्यासाठी अनेक निर्बंध शासनाच्या वतीने लावण्यात आले आहेत. त्यामुळे आज ही वारी प्रातिनिधिक स्वरूपात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील समाधी स्थळापासून मुक्ताईनगर शहरातील नवीन मुक्ताईनगर मंदिरापर्यंत पायी वारी काढण्यात येणार आहे. त्या ठिकाणी काही दिवस विधिवत पूजन करून नंतर शासन आदेशानुसार बसच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना होणार आहे.