पंढरपूर : कार्तिकी यात्रा (Kartiki Yatra) दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाचं पंढरपूरमध्ये (Pandharpur) धोकादायक इमारतींना आता प्रशासनाने नोटीस देण्यास सुरुवात केली आहे . शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक धोकादायक इमारती असून या पाडण्यात अनेक अडचणी असल्याने प्रत्येक यात्रेपूर्वी आशा इमारतींना पालिका प्रशासन नोटिस देत असते. धोकादायक इमारती, मठ, जुने वाडे यामध्ये भाविक निवसास थांबल्यास मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.
या वर्षी पाऊसकाळ चांगला होऊन परतीचा पाऊस ही जोरात राहिल्याने या धोकादायक बनलेल्या जवळपास 137 इमारती अधिक धोकादायक बनल्या आहेत. धोकादायक इमारतीचा प्रश्न वर्षानुवर्षे हा कोर्टामध्ये अडकल्या आहेत. धोकादायक इमारतीचा हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. शहरातील या धोकादायक इमारतीचा प्रश्न सुटल्यास प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसरातील या वास्तूंचा धोका वारकऱ्यांना होणार नाही. सध्यातरी या धोकादायक इमारती, मठ आणि वाडे यामध्ये कुणीही वास्तव्य करू नये असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेने केले आहे.
दिंड्यांसाठी वेगळी यंत्रणा उभारणे प्रशासनासमोरील मोठे आव्हान
कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरी गजबजली आहे. वारकरी मोठ्या संख्येनं पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील रस्त्यांच्या डागडुजी करण्यात येतेय.. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम प्रशासनाने सुरु केलीय. उजनी धरणातून चंद्रभागेत पाणी सोडणे सुरूच असल्याने चंद्रभागेत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे . यात्रेसाठी येणारे भाविक स्नानासाठी चंद्रभागेवर येत असताना सध्याची पाणीपातळी कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरवर्षी पंढरपूरला कार्तिकी एकादशीला आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी अनेक भाविक जात असतात. आषाढी एकादशीला जिल्ह्यात शेतीची कामे असल्याने अनेक भाविकांना आषाढी एकादशीला जाता येत नाही. त्यामुळे कार्तिकी एकादशीला अनेक भाविक पंढरपूर यात्रेसाठी जात असतात . पायी येणाऱ्या दिंड्यांसाठी वेगळी यंत्रणा उभारणे आता प्रशासनासमोरील मोठे आव्हान असणार आहेत.
विठ्ठल भक्तांसाठी 24 तास दर्शन
दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त कार्तिकी यात्रा होणार असल्याने संपूर्ण यात्रा काळात आजपासून लाखो भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे. सर्वसाधारणपणे यात्रा काळात म्हणजे मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे . यामुळे यात्राकाळात तासाला अडीच ते तीन हजार भाविकांचे देवाच्या पायावर दर्शन होत असल्याने दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. आषाढी वारीला ज्या प्रमाणे भाविक पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला येतात त्याचप्रमाणे कार्तिकी यात्रेलाही भाविकांची मोठी गर्दी असते. या दोन्ही एकादशीच्या दरम्यानच्या काळात चातुर्मास पाळला जातो.