पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये पहिल्यांदाच ट्रायथलॉन आणि ड्युएथलॉन शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. पालघर जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन आणि आयर्नफिट इंटरनॅशनलच्या वतीनं आयोजित ट्रायथलॉन शर्यतीत सेनादलाच्या गुरुदत्त घरतनं पुरुषांचं, तर नाशिकच्या अनुजा उगलेनं महिलांचं विजेतेपद पटकावलं.


विरारमध्ये रविवारी आयोजित केलेल्या ट्रायथलॉन शर्यतीत दीड किलोमीटर पोहणं, 40 किलोमीटर्स सायकलिंग आणि 10 किलोमीटर्स धावणं असं तिहेरी आव्हान होतं. केवळ सायकलिंग आणि रनिंगच्या एकत्रित अंतरासाठी ड्युएथलॉनची स्वतंत्र शर्यत होती. पण मुख्य आकर्षण हे ट्रायथलॉनचंच होतं.

मुंबईसह पालघर जिल्ह्यातल्या तरुणांमध्ये ट्रायथलॉनची आवड निर्माण व्हावी, यासाठी पालघर जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन व आयर्नफिट इंटरनॅशनलच्या वतीनं ट्रायथलॉन आणि ड्युएथलॉन शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. तीन आंतरराष्ट्रीय आर्यनमन ट्रायथलॉन शर्यतींचे फिनिशर असलेल्या हार्दिक पाटील यांनी त्यासाठी खास पुढाकार घेतला होता.

सेनादलाच्या गुरुदत्त घरतनं पुरुषांच्या ट्रायथलॉन शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं. तर नाशिकच्या सोळा वर्षांच्या अनुजा उगलेनं महिलांची ट्रायथलॉन जिंकून महाराष्ट्राचं नाव राखलं. मॅरेथॉनपाठोपाठ महाराष्ट्रात आता ट्रायथलॉन शर्यती लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. आणि याच शर्यतींमधून महाराष्ट्राला चॅम्पियन ट्रायअॅथलिट्सही मिळत आहेत.