पालघर : पालघर हा विविधतेने नटलेला जिल्हा. या जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन सौंदर्य दिले आहे. मात्र सध्या या जिल्ह्यावरही कोरोनाचे संकट घोंगावत आहे. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही कमालीची रुग्ण संख्या वाढत आहे. परिणामी मजुरांची कमतरताही जाणवू लागली आहे.  शेतीच्या कामावरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातीलच माणसांना भात रोपणी करणं भाग पडत आहे. याच कामाला ग्रामीण जिल्ह्यातील आमदारही चुकले नाहीत. खरंतर विक्रमगड मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सुनील भुसारा यांची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांचे वडील ही राजकारणात पारंगत होते आणि शेतकरी होते. मोखाडा तालुक्यातील हिरवे गावात त्यांची शेती आहे. सध्या मतदारसंघाचे काम पाहता पाहता कोरोना काळात आमदार सुनील भुसारा हे स्वत: आपल्या कुटुंबासोबत ट्रॅक्टरने नांगरणीबरोबर भात लावणीच्या कामात गुंतले आहेत. या भागात यांत्रिक शेती बरोबर पारंपरिक शेतीही केली जाते.



तर दुसरीकडे पालघर विधानसभेचे शिवसेना आमदार श्रीनिवास वणगा यांनीही आपले पाय शेतीत रोवले असून तेही भात लावणीसाठी आपल्या कुटुंबासोबत शेतीची कामं आटोपण्यात व्यस्त आहेत. खरंतर दिवंगत खासदार चिंतामण वनगा हेही पूर्वीपासून शेतीत पारंगत होते. रोज सकाळी उठून शेतीची कामं पाहायची आणि नंतर मतदारसंघाची काम करायची ही त्यांची नेहमीची सवय होती. तोच वसा सध्या आमदार श्रीनिवास वनगा सांभाळत आहेत.


मात्र सध्या कोरोना संकटाच्या काळात सर्वानाच आपल्या पारंपरिक शेतीच्या कामांना हात घालावा लागला आहे. हे या दोन आमदारांच्या कामावरुन अनुभवायला मिळते.



यंदा मान्सूनच्या पावसाने शेतकऱ्यांनी हळव्या भात पेरण्या आटपल्या होत्या. तर काही शेतकऱ्यांनी गरव्या भात पेरण्याही केल्या होत्या. मान्सूननंतर जिल्ह्यात पावसाने जवळपास दहा दिवस दांडी मारली होती. त्यामुळे सर्वच शेतकरी चिंतेत होते परंतु गेल्या आठ दिवसापासून पालघर जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो.


Shriniwas Vanga | आमदार श्रीनिवास वनगा कुटुंबासोबत शेतीची कामं आटोपण्यात व्यस्त


Sunil Bhusara | ट्रॅक्टरने नांगरणीबरोबर आमदार सुनील भुसारा यांची भात लावणी