Palghar : अंबाडी जवळील दिघाशी येथे रंगपंचमीला भरणारी गावदेवी यात्रा ही पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा आहे. या वर्षी कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.


दिघाशी येथील गावदेवी यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून या देवीकडे नवस घेतल्यावर तो पूर्ण होतो असा भक्तांचा विश्वास आहे. नवस घेण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक भक्त या यात्रेला येत असतात. रात्री अनेक सोंगे नाचवत या पालखी सोहळ्याला सुरुवात होते. 


जवळपास पूर्ण रात्रभर सूत्रधार, गणपती, सरस्वती, दशरथ राजा, राम , हिरण्यकश्यपू, आगीरतन, हनुमंत यांच्यासह जवळपास 25 पात्रे (सोंगे) नाचवली जातात. त्यानंतर सर्वात शेवटी गावदेवी आणि मैसासुर यांच्यात युद्ध होऊन या पालखीची सांगता होते. त्यांनतर दुसऱ्या दिवशी गावदेवी मातेची पूर्ण गावात मिरवणूक काढली जाते. 


या मिवरवणुकीत वेगवेगळ्या प्रकारचे नवस देवीला अर्पण केले जातात. विशेष म्हणजे गावदेवी मातेचे पात्र घेणारी व्यक्ती ही महिला नसून एक पुरुष असून हे पात्र घेणारी गावदेवी माता ज्याच्या अंगी येते ती व्यक्ती काहीच न खाता फक्त दुधावर जवळपास पाच दिवस काढत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिघाशी येथील गावदेवी यात्रेला भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. पालघर जिल्ह्यातील अनेक भक्त या यात्रेला आले होते. अंबाडी जवळील दिघाशी येथे ही गावदेवी यात्रा भरली होती. 


संबंधित बातम्या


Palghar: दारूच्या व्यसनापायी पोटच्या मुलाकडून आईची हत्या, पालघरच्या तारापूर येथील घटना


राज्यात रोजगार हमी योजनेच्या मजुरांची 166 कोटी मजुरी थकीत, मजुरांवर उपासमारीची वेळ


याला म्हणतात प्रेम! बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला; जीवाची बाजी लावून 72 वर्षीय पतीने वाचवला पत्नीचा जीव


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha