Hingoli: हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांना आणि धरणांना पुरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरील इसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे तब्बल 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या या धरणातून तब्बल 54,400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदी पात्रात करण्यात येत आहे. या पाणलोटामुळे पैनगंगा नदीला प्रचंड पूर आला असून नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले आहे. त्यामुळे पुसद-कळमनुरी महामार्गावरील वाहतूक कालपासून पूर्णपणे बंद झाली आहे. पुलावरून साधारण चार ते पाच फूट उंचीचे पाणी वाहत असल्याने रस्ता पूर्णपणे जलमय झाला असून वाहनांना मार्ग काढणे अशक्य झाले आहे. परिणामी पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला

ही नदी म्हणजेच यवतमाळ व हिंगोली जिल्ह्याची सीमा असल्याने या पुराचा फटका दोन्ही जिल्ह्यांना बसत आहे. इतकेच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातील शेतीलाही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या शेतांमध्ये आधीच पाणी साचू लागले आहे. या परिस्थितीमुळे मराठवाडा आणि विदर्भाचा थेट संपर्क तुटला आहे. अनेक प्रवाशांचे हाल होत असून रस्त्याने होणारी दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठावर जाण्याचे टाळावे आणि पुलाजवळ अजिबात न थांबण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी वाहतूक बंद झाली आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी माधव दीपके यांनी पाहणी केली असून पुलावरून प्रचंड वेगाने वाहणारे पाणी किती धोकादायक आहे याचे प्रत्यक्ष दृश्य अनुभवले. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने पाणीस्तर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नदीच्या पुरामुळे शेकडो हेक्टरवरील पिकाचं नुकसान

मागील दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणच्या नद्यांना पूर आला आहे, त्याच प्रमाणे कयाधू नदीला काल पूर आला होता, या पुराचं पाणी नदीचे पात्र सोडून बाजूच्या शेतीमध्ये शिरले होते, त्यामुळे  कयाधू नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेतजमीनि वरील पिकांना फटका बसला आहे, सोयाबीन कापूस हळद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे, शेतातील पिकांच्या मुळ्या उघड्या पडल्या आहेत तर पिके सुद्धा मातीत मिसळली आहेत त्यामुळे पुढील काळात या पिकांमधून कोणतही उत्पन्न निघणार नाही,या नुकसानीमुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत,