उस्मानाबाद:  नगरपालिका भरारी पथकाने लोकमंगल ग्रुपच्या पकडलेल्या 91 लाखांच्या रोकडप्रकरणी, सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात आहे. कारण या पैशाचा हिशेब देताना, सहकारमंत्री रोज नव-नवी कारणं देत आहेत.


उमरग्यात 'लोकमंगल' ग्रुपची जी 91 लाखाची रोकड पोलिसांनी जप्त केली होती, त्यात अनियमितता असल्याची स्पष्ट कबुली सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. इतकंच नव्हे तर हा त्याबद्दल असलेली शिक्षाही आपण भोगायला तयार असल्याचं देशमुख म्हणाले.

उमरग्यामध्ये 16 नोव्हेंबरला देशमुख यांच्या लोकमंगल समुहाची 91 लाख 50 हजारांची रोकड उस्मानाबादच्या नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली. ज्यामध्ये एक हजाराच्या जुन्या नोटा होत्या. मात्र ही ऊसतोडणी कामगाराच्या टोळीला देण्यासाठी होती, असा दावा सुभाष देशमुख यांनी केला.

विशेष म्हणजे ही रोकड लोकमंगलमधून 5 तारखेला काढण्यात आली होती. त्यामुळं नोटाबंदीच्या निर्णयानंतर ही रोकड पुन्हा बँकेत जमा करणं आवश्यक होतं. मात्र तसं न करता ही रोकड ऊसतोड कामगारांना वाटण्यासाठी नेली जात असल्याचा दावा लोकमंगलनं केला होता.

"5 नोव्हेंबरला कॅश सोलापूरच्या मुख्य शाखेहून उमरगा शाखेला लोकमंगल कारखानाचे कर्मचारी पेमेंट आणि ऊस तोडणी पगार करण्यासाठी दिले होते. पण सहा तारखेला रविवार आला. म्हणून ती रक्कम 8 दिवस लोकमंगल बँकेत ठेवली. नोटाबंदी नंतर ही रक्कम जिल्हा बँकेत जमा करता येईल अशी आशा होती. " असं सुभाष देशमुख म्हणाले.

बंदी असताना इतकी मोठी रक्कम बँकेत ठेवणे ही अनियमितता मान्य आहे, अनियमितता झाली असेल तर शासन भोगायला तयार आहे, असं सुभाष देशमुख यांनी मान्य केलं.

निवडणूक आयोगाला दिलेल्या स्पष्टीकरणात मात्र ही रक्कम लोकमंगल मल्टिस्टेट बँकेची असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे या रकमेमागचं गौडबंगाल तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.



या रोकडप्रकरणी सुभाष देशमुख यांनी दिलेली स्पष्टीकरणं

1) ही रक्कम ऊसतोडणी कामगाराच्या टोळीला देण्यासाठी होती

2) ही रक्कम लोकमंगल मल्टिस्टेट बँकेची होती

सुभाष देशमुख यांचं निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण

"5 तारखेला 81 लाख रुपये लोकमंगलच्या लोहारा शाखेत पाठवले होते. त्यानंतर 8 तारखेला 500-हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय आला. हा पैसा बँकेत ठेवणं योग्य नसल्यामुळे सोलापूरच्या मुख्य शाखेकडे लोहारा, उमरगा ब्रँचचे पैसे पाठवत होतो. तेव्हा हे पैसे निवडणूक आयोग पथकाला सापडले", असं स्पष्टीकरण सुभाष देशमुख यांनी निवडणूक आयोगाला दिलं.

सुमारे एक कोटीची रोकड जप्त

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाची जवळपास एक कोटीची रक्कम नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली होती. उस्मानाबादच्या उमरगा इथं ही कारवाई केली. नगर पालिका गस्ती पथकानं 91 लाख 50 हजार रुपयांची रक्कम पकडली.

टाटा सुमो जीपमधून ही रोकड जप्त केली. जुन्या एक हजार नोटांच्या रूपात ही रक्कम होती. जीपवर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहाचं नाव होतं. ही रक्कम लोकमंगल बँकेची असल्याची प्राथमिक माहिती होती.

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. सहकारमंत्र्यांच्या उद्योगसमूहाच्या गाडीतल्या 91 लाखांविषयी कोणतीही कागदपत्रं नव्हती.



संबंधित बातम्या

पकडलेल्या नोटांबाबत सहकारमंत्री म्हणतात..
उमरग्यातील जप्त कॅशप्रकरणी सहकारमंत्र्यांचे दोन वेगवेगळे दावे