मुंबई : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा कालावधी 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' म्हणून साजरा करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्थांना या कालावधीत विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याविषयी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने शासन निर्णय जाहीर केला. ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी आणि कथाकथन, माहितीपट व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर देखील ही चळवळ सुरू झाली आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त अनेक उपक्रमाचे आयोजन करण्याच आले आहे.
सोशल मीडियावर '#मराठी_भाषा_पंधरवडा' हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होत आहे. सर्वांनी उत्सफूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन देखील सोशल मीडियावर करण्यात आले आहे. राज्यातील विविध महाविद्यालये, सामाजिक संस्थांमध्ये ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी, कथाकथन, माहितीपट, परिसंवाद, व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मराठी विकीपिडियावर लेखन करण्याच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करावे, असे या शासन निर्णयात सांगण्यात आले आहे.
नागपूरमध्ये मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत लोकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन नागपूर मेट्रोतर्फे करण्यात आहे. महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे ट्विटरवर एक उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ट्विटरवर विविध क्षेत्रातील मान्यवर मराठी कविता आणि साहित्याचे वाचन करतात. तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्धाटन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या हस्ते झाले. मराठी भाषेविषयी जागृती आणि संवर्धन करण्याच्या हेतूने हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.