मुंबई : या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात भारतीय रेल्वेची पहिली किसान रेल महाराष्ट्रातून बिहारपर्यंत धावली. या किसान रेल्वेच्या यशानंतर महाराष्ट्रातून संत्रा किसान रेल सुरू करण्यात आली. आणि या संत्रा किसान रेला देखील प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे आता समोर आले आहे. ही संत्रा किसान रेल ऑरेंज सिटी म्हणवल्य जाणार्‍या नागपूर इथून सुटून दिल्लीच्या आदर्शनगर तिथपर्यंत धावते. या रेल्वेचा मुख्य उद्देश नागपुरातील संत्रे देशाच्या विविध भागात पोचवणे हा आहे. एका महिन्यात या रेल्वेचा उपयोग करून 10 हजार क्विंटल पेक्षा जास्त संत्रांची वाहतूक केली आहे.


मध्य रेल्वेची संत्रा किसान रेल महाराष्ट्रातील संत्रा उत्पादकांसाठी वरदान ठरली आहे. ही संत्रा किसान रेल 14 ऑक्टोबरपासून संत्रानगरी असलेल्या नागपूर येथून सुरु झाली. सेवा सुरू झाल्याच्या एका महिन्यातच संत्रा किसान रेलने 10,332 क्विंटल संत्री आदर्शनगर दिल्लीला पाठवण्यात आली आहेत. तेथून ती देशाच्या इतर भागात पाठविली जातात. संत्री वरुड ऑरेंज सिटी, काटोल, पांढुर्णा, नरखेड आणि इतर ठिकाणांहून पाठविली गेली. आतापर्यंत चार फेऱ्या या संत्रा किसान रेलच्या करण्यात आल्या.



14 ऑक्टोबर - 2045 क्विंटल
21 ऑक्टोबर - 3610 क्विंटल 
28 ऑक्टोबर - 2152 क्विंटल 
4 नोव्हेंबर - 2525 क्विंटल


देशाच्या संत्र्यांच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्याचे योगदान 40 टक्के आहे आणि ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाणारे नागपूर हा महाराष्ट्रातील मुख्य संत्रा उत्पादन करणारा जिल्हा आहे. मात्र रस्ते वाहतुकीने ही संत्री देशाच्या विविध भागात पोचवण्यात अनेक अडथळे आणि दिवस जायचे. मात्र मध्य रेल्वेतून संत्रा-किसान रेलची सुरूवात हा एक मास्टर स्ट्रोक सिद्ध झाला आहे जो संत्रा उत्पादनासच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत्री देशभरात वितरणासाठी मार्ग सुलभ करेल. महाराष्ट्रातील संत्रा उत्पादकांसाठी हे वरदानापेक्षा कमी नाही.