Ajit Pawar : "राज्यात घटनाबाह्य सरकार सत्तेवर आलं आहे, यांचा मंत्रिमंडळ विस्तार प्रस्तावित होता, मात्र ते करत नाहीत. कारण यांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर काय होईल याची भीती आहे. एका-एका मंत्र्यांकडे सहा-सहा जिल्ह्यांचा कारभार आहे अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली. नुसतं सभा मारून लोकांची कामे होत नाहीत तर सर्वसामान्य लोकांना वेळ देणारा, कामं करणारा नेता लागतो असा टोलाही त्यांनी शिंदे सरकार आणि भाजपला लगावला आहे. लातूर जिल्ह्यात आज नूतन सरपंचांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे नूतन ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अजित पवार अहमदपूरला आले होते. नूतन सरपंचांना मार्गदर्शन करताना त्यांनी जास्तीत जास्त लोकाभिमुख कामे करण्यावर भर दिला. लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य लोकांसाठी वेळ द्यावा, त्यांची कामे करावीत हे अपेक्षित असतं. मात्र, आजकाल सभा मारून नेणारे भाजपसारखे नेते तयार झाले आहेत अशी टीका त्यांनी केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर अनेक सर्वसामान्य लोक आमदार झाले, खासदार झाले. मात्र त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. पुढील काळात गद्दारी करणारे निवडून आले नाहीत हा आजपर्यंतचा इतिहास आहे. तो इतिहास आता गद्दारी करणारे विसरले असतील. मात्र, सर्वसामान्य जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
खासदार प्रज्ञा सातव यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, आदित्य ठाकरे यांच्याही गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा भाड हल्ला करणाऱ्यांचा बोलवता धनी कोण आहे? हे शोधलं पाहिजे. मागील काही दिवसांत मोठे उद्योग राज्याच्या बाहेर गेले आहेत आणि हे सरकार गप्प आहे. राज्यातील महापुरुषांबाबत अपशब्द काढले जातात. मात्र, सरकार गप्प आहे. राज्यातील जनता हे खपवून घेणार नाही असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.
अजित पवार म्हणाले, "दिल्ली येथे बसून अनेक डे साजरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 'काऊ हग डे' साजरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आम्ही शेतकरी आहोत. गाईच्या अंगावरून हात फिरवला जातो. हग केले जात नाही. ती लाथ घालत असते. याची कोणतीच माहिती नसलेले लोक असे डे साजरे करतात. जुन्या काळात वय झालेली जनावरे बाजारात नेली जात असत. आता ती विकायची नाही असं भाजप सरकार सांगतंय. मात्र, त्यांच्या चाऱ्याच्या प्रश्नाचं काय? त्याची उपाययोजना काय? याबाबत कोणताही निर्णय घेत नाही. असं निर्णय शून्य हे सरकार आहे."
हे घटनाबाह्य सरकार अस्तित्वात आल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय चर्चेत होता. अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही. मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांची नाराजी ओढून घेणे त्यांना शक्य नाही. एका एका मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचा कारभार आहे. यामुळे विकासकामांना गती नाहीये लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. याची कसली जाणीव सरकारला नाही अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
नूतन ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाच्या सत्कार समारंभ अहमदपूर येथे आयोजित करण्यात आला होता. अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील नूतन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षक आमदार विक्रम काळे, अहमदपूरचे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील आणि उदगीरचे आमदार संजय बनसोडे हे कार्यक्रमाला उपस्थित होते.