नागपूर: सर्वसामान्यांची फसवणूक झाल्याचं आपण बऱ्याचदा ऐकतो. पण नागपूरमध्ये एका भामट्यानं चक्क खाकी वर्दीच्या खिशातच घात घातला. धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक करणारा दुसरा कोणी नसून पोलीस कर्मचारीच आहे. पण झटपट पैसा कमवण्याची लालसा, इतर पोलिसांना चांगलीच महागात पडली.


नागपूरमध्ये एका पोलिसानेच इतर पोलिसांना गंडा घातला. 25 टक्के व्याजाचं आमिष दाखवून पोलीस कर्मचारी बबलू बागडेनं सर्वसामान्यांसह पोलिसांनाही गंडा घालता.

बबलू बागडे नागपुरातल्या पोलीस मुख्यालयात कामाला होता. विविध पोलीस स्टेशनमध्ये बागडे टपाल घेऊन जायचा. त्यामुळं ओळखीचा फायदा घेत, बागडेनं डाव साधला.

कुणी हजार रुपये तर कुणी पाच हजाराची रक्कम दर महिन्याला पोलीस कर्मचारी बागडेकडे गुंतवत होते. आतापर्यंत 110हून अधिक तक्रारी आल्या आहेत. तर हसं होऊ नये, म्हणून काही पोलीसच तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचं समजतं आहे.

बागडेनं वार्षिक फंडाच्या नावाखाली योजना केली होता. सध्या त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस स्टेशनमधून तर तब्बल 20 ते 25 कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली आहे

सूत्रांच्या माहितीनुसार महिन्याभरातल्या तपासात फसवणुकीचा आकडा 57 लाखांच्या घरात आहे. मात्र फसवणुकीच्या या प्रकरणात कोट्यवधींची हेराफेरी झाली आहे. त्यामुळं पोलिसांवरच स्वत:च्या फसवणुकीची तक्रार देण्याची वेळ आली आहे.