Omicron Case In Latur  : संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रोन विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. डोंबिवली, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरनंतर आता लातूरमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. हाय रिस्क देशातून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं तपासातून स्पष्ट झालेय. या व्यक्तीचे जिनोम सिक्वेसिंगसाठी नमुने पुण्याला पाठवले होते. यामध्ये हा व्यक्ती ओमायक्रॉन बाधित आढळला आहे. या व्यक्तीमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 


गेल्या काही दिवसांत लातुरात 94 नागरिक परदेशातून दाखल झाले होते. त्यामधील एका व्यक्तीला ओमायक्रोनची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. लातुरात आलेल्या 94 जणांपैकी काही जण राज्य शासनाने जाहीर केलेल्या अति जोखमीच्या देशातून आलेले आहेत. तर उर्वरित नागरिक कमी जोखमीच्या देशातून आलेले आहेत.  


विदेशातून आलेल्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामधील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला. या पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे जीनोम सिक्वेनसिंग करण्यासाठी  नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रामध्ये पाठवण्यात आले. सोमवारी रिपोर्टमध्ये तो व्यक्ती ओमायक्रॉनबाधित असल्याचं समोर आलं. या व्यक्तीवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. लक्षणे सौम्य आहेत मात्र प्रशासन सर्व काळजी घेत आहे. ओमायक्रॉन बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसेच त्यांना विलगीकरणातही ठेवण्यात येईल.  


राज्यातील ओमायक्रॉनचे 19 रुग्ण -
लातुरमध्ये सोमवारी ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार लातूर येथे एक व्यक्ती ओमायक्रॉन बाधित आढळलेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 19 इतकी झाली आहे. यामध्ये मुंबईत 5, पिंपरी चिंचवडमध्ये 10, पुणे मनपामध्ये एक, कल्याण डोंबिवली 1 आणि नागपूरमध्ये एक असे रुग्ण आढळले आहेत. 19 पैकी 9 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. नऊ रुग्णांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.