Laxman Hake on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे ( Manoj Jarange) हे जर निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या विरोधात त्याच मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार असल्याची भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील हे जागाही लढवत नसतात आणि काहीच करत नसतात, ते एक सुपारीबाज नेते आहेत, असंही हाके म्हणाले.


महाराष्ट्र विधानसभेला तुतारी, मशाल आणि पंजाला म्हणजेच महाविकास आघाडीला ओबीसी मतदान करणार नाहीत असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले. कोणत्याही ओबीसी मतदाराने यांना मतदान करू नये अन्यथा ओबीसीचे आरक्षण संपुष्टात येणार असल्याचे हाके म्हणाले. महाविकास आघाडीकडून लढणार्‍या ओबीसी नेत्यांनी आधी ओबीसींची याबाबतची भूमिका स्पष्ट करून घ्यावी, अन्यथा तुम्हाला ओबीसी मतदान करणार नाहीत असा इशारा हाके यांनी दिला. तुम्ही आमचे नेते असून तुम्हाला मत द्यायची आम्हाला खूप इच्छा आहे. मात्र जे ओबीसी आरक्षण संपवायला निघालेत त्यांच्या पक्षातून तुम्ही उभारल्यास इच्छा असूनही ओबीसी समाज तुम्हाला मतदान करणार नाही,असे म्हणत महाविकास आघाडीतून उभारणाऱ्या ओबीसी उमेदवारांना लक्ष्मण हाके यांनी इशारा दिला आहे.


आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं


राज्यात सध्या आचारसंहिता सुरु झाली आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. महाविकास आघाडी आणि महायूतीच्या नेत्यांच्या जागावाटपाच्या चर्चा देखील सुरु आहेत. अद्याप जागावाटपाचा निर्णय झाला नाही. अशातच राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच ओबीसी आंदोलक लक्ष्ण हाके यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत, महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. ओबीसी समाज महाविकास आघाडीला मतदान करणार नसल्याचे लक्ष्मण हाके म्हणालेत. तर मनोज जरांगे पाटील जर निवडणुकीला उभे राहिले तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे.


20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार


महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.  तर दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एकीकडे राज्याचे राजकारण तापले असताना या आंदोलनाचे पडसाद आगामी निवडणुकांवरही उमटणार असल्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Laxman Hake : ओबीसींची भूमिका आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चित दिसेल; निवडणुका जाहीर होताच लक्ष्मण हाके यांचा आक्रमक पवित्रा