मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहणारे विद्यमान न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे 27 एप्रिल रोजी निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर या रिक्त पदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाकडून दत्ता यांच्या नावाची 19 एप्रिलला शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 23 एप्रिलला त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांचा कोलकाता ते मुंबई 2000 किमी प्रवास
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानसेवा, देशभरातील रेल्वे वाहतूकही पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कोलकाताहून मुंबईला पोहोचायचे कसे? असा सवाल न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्यासमोर होता. त्यामुळे अखेरीस नाईलाजाने त्यांनी रस्तेमार्गे तब्बल दोन हजार किमीहून अधिकचा प्रवास करुन मुंबई गाठण्याचे ठरवले. शनिवारी सकाळी कोलकात्याहून न्यायमूर्ती दत्ता यांनी आपला प्रवास सुरु केला होता. सोमवारी संध्याकाळी ते मुंबईत दाखल झाले.
न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी निवृत्त
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहणारे न्यायमूर्ती भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी निवृत्त झाले आहेत. मूळचे नागपूरचे असलेले धर्माधिकारी कडक शिस्तीचे आणि झटपट निर्णय देणारे न्यायमूर्ती म्हणून त्यांची ओळख होती. मुंबई उच्च न्यायालयातील आपल्या कारकीर्दीत शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनी कायद्यातील तरतुदीला दिलेलं आव्हान, राठी प्रकरण, एनजीओ मर्डर केस, अँग्नेलो वल्दारिसचा कोठडी मृत्यू यांसारखी प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत. त्याचबरोबर काही प्रकरणांत फाशीची शिक्षा झालेल्यांना पुराव्याअभावी त्यांनी निर्दोषही मुक्त केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर धर्माधिकारी यांच्या कारकीर्दीत प्रथमच उच्च न्यायालयात डिजिटल माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत सुनावणी पार पडल्या.
संबंधित बातम्या :
#Lockdown | अधिक रुग्ण असलेल्या शहरात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती