North Maharashtra Rain Update : उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून, नाशिकपासून (Nashik) ते नंदुरबारपर्यंत (Nandurbar) पावसाने थैमान घातल्याचे चित्र आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि पुराच्या पाण्यामुळे काही गावांमध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागत आहे. काही भागात तर नद्यांमध्ये वाहने वाहून गेली आहेत. तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसले आहे. उत्तर महाराष्ट्र शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट, 14 धरणांतून विसर्ग सुरू
नाशिक शहरात नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. केवळ दीड तासात 37 मिमी पावसाची नोंद झाली. आधीच ढगाळ वातावरण आणि मागील आठवड्याच्या संततधारेनंतर पुन्हा झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. गंगापूर धरणाचा साठा 98.95 टक्क्यांवर पोहोचल्यामुळे 2,272 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील 14 धरणांतून विसर्ग सुरू असून, जिल्ह्याला 19 ते 24 सप्टेंबर दरम्यान यलो अलर्ट देण्यात आला आहे. गिरणा धरण 100 टक्के भरल्यानंतर 6 दरवाजे उघडण्यात आले असून 14,856 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांतील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात पूरस्थिती
जळगाव जिल्ह्यात पावसाने मोठा कहर केला आहे. पाचोरा व भडगाव परिसरात मुसळधार पावसामुळे भडगाव ग्रामीण रुग्णालयात पुराचे पाणी शिरले. ट्रॅक्टरमधून रुग्ण व कर्मचारी यांना हलवावे लागले. बहिरम नगरमध्ये अनेक घरांची पडझड झाली असून संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. भाकरी गावातील तरुण सतीश चौधरी नाल्यात वाहून गेला असून शोधकार्य सुरू आहे. अग्नवती नदीला पूर आलेला असून, नगर देवळा गावात अद्यापही पुराचे पाणी शिरलेले आहे.
अहिल्यानगरमध्ये पावसाचा धुमाकूळ
शेवगाव तालुक्यात रात्रीपासून संततधार पावसाने कहर केला असून, सूर्यकांता नदीला पूर आला आहे. यामुळे शेवगाव–पैठण व शेवगाव–गेवराई मार्ग बंद झाला आहे. एक आयशर टेम्पो नदीत वाहून गेला असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. नगर–कल्याण महामार्ग दुसऱ्या दिवशीही बंद होता. नदीकाठची शेती व फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून, 7 तालुक्यांतील 84,860 हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले आहे. 1,16,641 शेतकरी बाधित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात शेतीपिके पाण्याखाली
नवापूर शहरातून वाहणाऱ्या रंगवली नदीचा जलस्तर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, रंगवली धरण ओव्हरफ्लो झाले आहे. 15,915 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पाण्याचा जोर अधिक असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातच्या भागातही जोरदार पावसामुळे नदीला पूर वाढला आहे. अनेक शेतीपिके पाण्याखाली गेल्याची शक्यता आहे.
धुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल
धुळे शहरासह परिसरात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे हरभरा, दादर मका व कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके अक्षरशः जमिनदोस्त झाली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मात्र, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासनाचा एकही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेला नाही, अशी तक्रार होत आहे.
आणखी वाचा