नववधू आणि वराला थेट दर्शन मिळणार असलं तरीही त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांना मात्र, दर्शनरांगेनेच यावं लागणार आहे. शनिवारपासून हा निर्णय लागूही करण्यात आला आहे.
विवाहानंतर आपल्या नवजीवनाची सुरुवात करण्यापूर्वी नववधू आणि वर जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला येतात. यावेळी इथे तळीभंडार, जागरण-गोंधळ हे धार्मिक विधीही केले जातात.
गेल्या काही वर्षात इथं भाविकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यामुळे नवविवाहित दाम्पत्यांना देखील दर्शन रांगेत तासनतास उभे राहावे लागते. दरम्यान, यापुढे नवविवाहित जोडप्याला दर्शन रांगेत उभं राहावं लागू नये यासाठीच थेट दर्शनाचा निर्णय जेजुरी मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे.
असं मिळणार नवविवाहित जोडप्याला थेट दर्शन :
सर्वप्रथम नवविवाहित जोडप्याला मंदिर आवारातील कार्यालयात जाऊन रजिस्टरमध्ये नोंद करावी लागेल. त्यानंतर येथील कर्मचारी त्यांना मुख्य मंदिरात घेऊन जातील. पुन्हा कार्यालयात आणून नववधूची खणा-नारळाने ओटीही भरण्यात येईल.