रायगड : गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये यासाठी राज्य सरकारने जालीम उपाय काढला आहे. 1 ते 6 सप्टेंबरपर्यंत या काळात मुंबई-गोवा हायवेवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
1 ते 6 सप्टेंबर या काळात 16 टनपेक्षा जास्त भार वाहणाऱ्या ट्रक, ट्रेलर्सना मुंबई-गोवा महामार्गावर रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी रात्री 8 पर्यंत धावता येणार नाही. तर 6 ते 14 सप्टेंबरपर्यंत मुंबई-गोवा हायवेवर अवजड वाहनांना सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंदी असेल.
15 सप्टेंबर (अनंत चतुदर्शी) ते 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत अवजड वाहनांना कोकणात एन्ट्री नसेल. मात्र दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन आणि भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वाहून नेणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.
गणेशोत्सवादरम्यान कोकणवासियांसाठी ज्यादा गाड्या सोडण्यात येतात. परंतु जड वाहनं आणि रेत वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव चाकरमान्यांसाठी ट्रॅफिक फ्री राहिल, असं दिसत आहे.