Jitendra Awhad on Nitin Gadkari: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा गंभीर आरोप करत निवडणूक आयोग आणि भाजपवर चौफेर हल्ला चढवला आहे. या मोहिमेला बळ देण्यासाठी राहुल यांनी आज (10 ऑगस्ट) वेबसाईट प्रारंभ करताना मिस्ड काॅलसाठी नंबरही जारी केला आहे. त्यामुळे आयोगाविरोधात राहुल यांनी दंड थोपटले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा नोव्हेंबर 2024 मधील महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतरचा इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

साडेतीन लाख नावे कट करण्यात आली

हा व्हिडिओ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा ट्विट करत गडकरी यांना पाडायचा निर्णय जवळजवळ झाला होता, असा दावा केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नितीन गडकरी यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये तब्बल साडेतीन लाख नावे कट करण्यात आल्याचे म्हटले आहे. यामध्ये जे माझे मतदार होते जवळचे मतदार होते, त्यांचीच नावे कापली आहेत, असेही गडकरी सांगत आहेत. 

ये अंदर की बात है, नितीन गडकरी 'सत्य' के साथ है!

आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत, आपली साडेतीन लाख मते कापली गेली होती, अशी व्यथा व्यक्त करून दाखविली. पण, त्याहून आणखी एक सत्य असे आहे की, नितीन गडकरी यांना तिकिट देण्यातच अडचण निर्माण करण्यात आली होती. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अतिशय आग्रही भूमिका घेतल्यानेच गडकरी यांना उमेदवारी मिळाली. गडकरी यांना पाडायचा, असा जवळ जवळ निर्णयच झाला होता. याकडे पाहता, जे काँग्रेस किंवा इतर पक्षांच्या उमेदवारांच्या बाबतीत केले गेले आहे, तेच नितीन गडकरी यांच्याबाबतही केले गेले आहे. नितीन गडकरींचे मी नेहमीच कौतूक करीत आलोय की, ते सत्य बोलायला कधीच मागेपुढे पहात नाहीत अन् घाबरतही नाहीत. ये अंदर की बात है, नितीन गडकरी 'सत्य' के साथ है!

कमजोर करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता का?

दरम्यान, तुम्हाला कमजोर करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता का? अशी विचारणा गडकरी यांना केली असता ते म्हणाले की मी कोणावर आरोप करत नाही. मात्र, ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये माझ्या जवळची नावे होती. माझे नातेवाईक होते. माझ्या कुटुंबातील व्यक्तींची सुद्धा नावे कापण्यात आली. त्यामुळे आता महाराष्ट्रातील संशयास्पद मतदारांमुळे आणि मतदारयाद्यांमुळे रणकंदन माजले असतानाच विरोधकांकडून आता गडकरींचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये ट्विट केला जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या