मुंबई : महाराष्ट्रात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे अनेक कामं सुरु आहेत. मात्र या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचं नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या नाना पटोले यांनी म्हटल की, 25 वर्ष भाजप आणि शिवसेना एकत्रित राहिले, तेव्हा तरी मंत्रीमहोदयांनी (नितीन गडकरी) कधीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसंदर्भात, शिवसेनेच्या वागणुकीबद्दल असे वक्तव्य केले नाही, पत्र लिहिले नाही. आता हे पत्र कोणाच्या तरी दबावाने, वरच्या दाढीवाल्याच्या (पंतप्रधान नरेंद्र मोदी) दबावात लिहिले आहे का? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
देशात महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार होत आहे, रस्ते निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधले जात आहेत, रस्ते प्रकल्पांची किंमत वाढवली जात आहे, त्याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे नाना पटोले म्हणाले. केंद्रीय मंत्री या मुद्द्यावर एखादी श्वेतपत्रिका काढणार का? असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. राज्यात चांगल्या दर्जाचे रस्ते झालेच पाहिजे. रस्ते प्रकल्पाचे कामकाज कोणीही अडवणार असेल तर आम्ही त्याचा विरोध करू असेही नाना पटोले यांनी म्हटलं.
नितीन गडकरी हे 'विकासपुरूष' आहेत. त्यांनी पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य कारवाई करतील, अशी अपेक्षा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात याला जबाबदार असलेला शिवसेनेचा नेता, कार्यकर्ता कितीही मोठा असला तरी मुख्यमंत्री कारवाई करतील, असा आशावाद बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
वाशिममधील शिवसेना रिसोड तालुका अध्यक्ष शिवसेना महादेव ठाकरेंच्या क्लिपच्या आधारे पुरावे सादर करण्यात आले. त्याबद्दल स्वत: महादेव ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. गडकरी साहेब जे रस्त्याचे काम केलं त्याला शिवसेनाचा विरोध नाही. विरोध असताच तर आम्ही जिल्ह्यातील 90 टक्के काम होऊ दिलं असतं का? जिथं शेतकऱ्याचं नुकसान, अपघात झालेत असल्या ठिकाणी आम्ही आंदोलन केले. मात्र शिवसेनेनं जिल्ह्यात कुठेच रस्त्याची कामं अडवली नाहीत. संपूर्ण आरोप खोटे असल्याचे महादेव ठाकरे यांनी म्हटलं.
वसूलीचे पैसे वरपर्यंत पोहोचत आहेत का?- राम कदम
नितीन गडकरी यांच्या सारख्या नेत्याला पत्र लिहून तक्रार करावी लागली यावरुन समजू शकतो की प्रकरण किती गंभीर आहे. ठाकरे सरकार वसूली सरकार आहे असा आरोप आधीपासूनच केला जातो आहे. आता विकासकामांमध्येही वसूलीची संधी यांना सोडायची नाही. वसूलीचे पैसे वरपर्यंत पोहोचत आहेत का? असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
नितीन गडकरी यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून, काही प्रगतीपथावर आहेत. मात्र, अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषतः वाशिम जिल्हयात हे प्रामुख्याने घडते आहे.