Nitesh Rane On Uddhav Thackeray : एका बाजूला शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) भाजपला (BJP) सातत्याने लक्ष्य केले जात असताना दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मात्र मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे इंडिया आघाडीच्या (I.N.D.I.A.) बैठकांना जातात तर दुसरीकडे भाजपसोबत युती करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा राणे यांनी केला आहे. राणेंच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मोठा दावा केला. राणे यांनी म्हटले की, काल चार राज्याचे निकाल लागल्यानंतर मोदींची गॅरंटी चालते यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमचे विरोधक शेमड्यासारखे रडत आहेत. ईव्हीएमची कमाल असल्याचे राऊत म्हणाले. तेलनगणामध्येही ईव्हीएमची कमाल आहे का? असा सवाल त्यांनी केला. मध्यप्रदेश मध्ये दिग्विजय आणि इकडं संजय राऊत भुंकत असल्याची बोचरी टीका राणे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी दोन्ही मुलांची शपथ घ्यावी...
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे जाणार असल्याचे संजय राऊत बोलत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे हे दुसरीकडे युतीमध्ये येण्यासाठी आमच्या नेत्यांजवळ पायघड्या घालत असल्याचा दावा राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी भाजपा सोबत युती करण्यासाठी प्रयत्न करत नाही हे दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान राणे यांनी केला.
चार राज्यातील महिला भगिनींचा अपमान
चार राज्याचे निकाल लागल्यानंतर मोदींची गॅरंटी चालते यावर शिक्कामोर्तब झालं असल्याचे राणे यांनी म्हटले. महिलांना पैसे देऊन मते विकत घेतली असे महिलांबाबात संजय राऊतने वक्तव्य केले. त्यामुळे चार राज्यातील महिला भगिनींचा अपमान झाला आहे, असे नितेश राणे म्हणाले.
संजय राऊत यांनी काय म्हटले होते?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, चार राज्यातील निकाल आले आहे. आम्ही लोकशाही मानणारे आहोत. Evm च्या माध्यमातून कालचा निकाल आला तो आम्ही स्वीकारतो. कालच्या निर्णयाने लोकांनाच धक्का बसला आहे. जो काही निकाल आलाय, त्याला मान्य केलं पाहिजे . ईव्हीएमने निकाल दिला असला तरी ईव्हीएमचा जनादेश आहे. निकाल अपेक्षित नसले तरी तांडव न करता जनमत स्वीकारावं लागेल. दिग्विजय सिंग यांनी evm बद्दल इंडियाचा मुंबईतील बैठकीत संशय व्यक्त केला होत.लोकांच्या मनात अशा शंका असेल तर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असेही राऊत यांनी म्हटले.