चंद्रपूर : राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट गंभीर होत असतानाच दुसरीकडे हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांचा पारा 45 अंशांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. 


राज्यात पुढील काही दिवस आरोग्य यंत्रणेचा कस लागणार आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. याला कारण राज्यातील उन्हाचा पारा वाढत आहे. हवामान खात्याने या बाबतचा इशारा दिला आहे. राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय तर दुसरीकडे तापमानाचा पारा देखील वाढतो आहे. राजस्थान आणि गुजरात या भागातून अतिशय गरम वाऱ्याचे प्रवाह मध्य भारताकडे प्रवाहित होत आहेत. जवळजवळ 100 किलोमीटर रुंदीचा हा वाऱ्याचा प्रवाह जळगाव ते चंद्रपूर असा असणार आहे.  यामुळे या पट्ट्यात येणाऱ्या भागात प्रचंड तापमान वाढ होणार आहे.


तापमान वाढीचे हे चटके चंद्रपूर जिल्ह्यात तर तीव्रतेने जाणवायला सुरुवात देखील झाली आहे. जिल्ह्यात सध्या सूर्यनारायण आग ओकतोय. ज्यामुळे लोकांच्या अंगाची लाही-लाही होतेय. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे चंद्रपूरचे तापमान 38 अंशांच्या घरात होते. मात्र एकाच आठवड्यात तापमानाने उसळी घेत 44 अंशांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे सामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले असून लोकांचं जनजीवन प्रभावित झालं आहे.


राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे ही उष्णतेची लाट तयार झाली असली तरी चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये कोळसा खाणी आणि उद्योगातून निघणारे गैसेस यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट तयार होतोय. यामुळे देखील या तापमान वाढीला हातभार लागत आहे, असं मत जाणकारांनी नोंदवलं आहे.