Konkan News Refinery :  कोकणात आता प्रस्तावित तेल शुद्धीकरण कारखान्याच्या नवीन जागेवरून वातावरण तापणार आहे. कारण रिफायनरी विरोधक आणि समर्थक जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला विरोध आणि पाठिंबा दाखवणार आहेत. 6 मार्च रोजी राजापूर येथे रिफायनरी समर्थक रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार असून 8 मार्च रोजी रिफायनरी विरोधक मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करणार आहेत. 


त्यामुळे किमान सध्या तरी शांत असलेल्या रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणातील वातावरण पुन्हा तापणार आहे. राजापूर तालुक्यातील बारसू-धोपेश्वर-गोवळ येथे तेल शुद्धीकरण कारखाना उभारावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकार देखील सकारात्मक असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी देखील तसे संकेत दिले आहेत. 


शिवाय, केंद्राचं पथक पाहणीकरता राजापूर येथे येणार असून खुद्द सुभाष देसाई यांनी देखील जागेची पाहणी करण्यासाठी भेट देणार असल्याची माहिती समर्थकांनी घेतलेल्या भेटीवेळी दिली आहे. त्यामुळे आता नाणार येथील रद्द झालेला प्रस्तावित तेलशुद्धीकरणाचा कारखाना कोकणातच आणि राजापूर तालुक्यात होणार असल्याचं मानलं जात आहे. त्यावरून आता वातावरण तापताना दिसत असून त्याची सुरूवात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये समर्थक आणि विरोधकांचे मोर्चे आणि धरणे आंदोलनानं होणार आहे. 


मुंबई मनपाच्या निवडणुका पाहता मुद्दा महत्त्वाचा


रिफायनरीच्या नवीन जागेवरून सुरू झालेला विरोध आणि समर्थन या गोष्टी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मुंबई मनपाच्या निवडणुका पाहता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. शिवसेनेची सध्याची बदलत असलेली भूमिका आणि चाकरमानी यांचं देखील समीकरण यामध्ये महत्वाचं आहे. मुख्य बाब म्हणजे कोकणी माणसाला किंवा स्थानिकांना हा प्रकल्प हवा कि नको यापेक्षा शिवसेना किंवा राजकीय पक्ष यांच्यासाठी हा मुद्दा मुख्य आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या देखील त्याला तितकंच महत्त्व आहे. आता या अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा हा मुद्दा तापणार असल्याचं स्पष्ट आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


'रिफायनरीसाठी उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबियांचा अद्यापही हिरवा कंदिल नाही' 


Konkan Refinery Project : कोकणातील रिफायनरीबाबत राज्य सरकार, शिवसेना सकारात्मक?