मुंबई : कोरोना संकटात जेईईची परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर व नीटची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने संपूर्ण देशात आज सोशल मीडियावर आंदोलनं केलं.  #SpeakUpForStudentSafety अंतर्गत देशभर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी या परीक्षेविरोधात आपली मतं सोशल मीडियावर मांडली. मुंबईत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी आंदोलनात भाग घेतला. केंद्र सरकारने राज्य सरकारची, विद्यार्थ्यांची भूमिका ऐकून घेतली पाहिजे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा नको अशी भूमिका त्यांनी मांडली.


यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, कोरोनाचं गंभीर संकट व अनेक राज्यात असलेल्या महापूराच्या संकटात #NEETJEE च्या परीक्षा घेण्याच्या हट्टामुळे केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोठ्या संकटात ढकलत आहे. मोदी सरकारने निर्णय घेण्याआधी विद्यार्थ्यांची बाजूही समजून घ्यावी, असं ते म्हणाले.





मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं की, #NEETJEE बाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या चिंता रास्त आहेत. केंद्र सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे, त्यावर गांभिर्याने विचार केला पाहिजे. शैक्षणिक नुकसान टाळणे आवश्यक आहे. पण सोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षितता देखील महत्वाची आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.





लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भूमिकेचा निषेध, असं मंत्री  विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.


युवक काँग्रेसचे अध्यक्ष  सत्यजीत तांबे म्हणाले की, कोरोनाच्या भयंकर परिस्थितीमध्ये केंद्र शासनाने #JEENEET च्या परिक्षा घेणे हा विद्यार्थी व शिक्षकांच्या जीवाला मोठा धोका आहे.
मोदी सरकारने आडमुठेपणाचे राजकारण करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळू नये, असं ते म्हणाले.


खासदार राजीव सातव म्हणाले की,  कोरोनाचं संकट गंभीर आहे. रेल्वे-विमानसेवा अशी दळणवळणाची साधनेही सुरळीत झालेली नाहीत. अशा परिस्थितीमध्ये #JEENEET च्या परिक्षा आत्ताच झाल्या पाहिजेत असा मोदी सरकारचा अट्टाहास का?, असा सवाल त्यांनी केला.