सांगली : संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नदीकाठी  15 जुलैपासून एनडीआरएफची पथके तैनात होणार असून अलमट्टी धरणातून पाणी विसर्ग नियोजनाबाबत पुढील आठवड्यात कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वडनेरे समिती आणि लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या उपायांनुसार काम केले जाईल, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.


संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती नियोजन आणि वडनेरे समिती अहवाल बाबत सांगलीमध्ये सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. पहिल्यांदा संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर नियोजन बाबत चर्चा पार झाली. त्यानंतर गतवर्षी आलेल्या महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने गठित केलेल्या वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा झाली.


याबैठकीनंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं की, संभाव्य पुराच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. बऱ्याच वर्षांपासून महाराष्ट्र, कर्नाटकमधील पूरस्थितीवर अभ्यास सुरू आहे. गत वर्षी आलेल्या पुरांचा शोध घेण्यासाठी सरकारने नेमलेल्या वडनेरे समितीचा अहवाल सरकारला मिळाला आहे. हा अहवाल स्वीकारण्यासाठी वेळ लागेल. मात्र या अहवालानुसार सरकार काम करेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्याच बरोबर संभाव्य पूर स्थितीबाबत प्रशासनाकडून सर्व पातळ्यांवर नियोजन करण्यात आले आहे. या शिवाय नदीकाठी 15 जुलैपासून एनडीआरएफची पथके तैनात होणार आहेत, तर नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे महापुराची भीती नागरिकांमध्ये आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असंही पाटील म्हणाले. तसेच पावसाळ्यात पुराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याशी चर्चा सुरू करण्यात येणार आहे. अलमट्टी धरणातून पाण्याच्या विसर्गाबाबत लवकरच कर्नाटक राज्य सरकारशी चर्चा सुरू होणार आहे. याबाबत बेळगावला आपण जाऊ, असंही ते म्हणाले.


वडनेरे समितीच्या अहवालातील सुचनांच्या अनुषंगाने पूरनियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा सर्व समावेशक बृहत आराखडा तात्काळ तयार करा, अशी सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. कृष्णा खोऱ्यातील 2019 मध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीची आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे विश्लेषण करून कारणे शोधणे, तांत्रिक उपाययोजना व धोरणे सुचविणे इत्यादी बाबत शासनाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या अभ्यास समितीच्या अहवालाचे सादरीकरण करण्यात आले.




सांगली, कोल्हापूर शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी वडनेरे समितीने सुचविलेल्या विविध उपाययोजनांचा महापालिकांनी बृहतआराखडा तयार करावा. यासाठी विशेष समिती गठीत करून तसा अहवाल तयार करण्याची सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.


पूराच्या अनुषंगाने महाराष्ट्र - कर्नाटकमध्ये समन्वय ठेवणार

आगामी काळात सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र - कर्नाटक सरकारमध्ये योग्य समन्वय ठेवण्यासाठी लवकरच कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्यासोबत कोल्हापूर अथवा बेळगावमध्ये सोयीने विशेष बैठक आयोजित केली जाईल, असे सांगून जयंत पाटील म्हणाले, संभाव्य पूर नियंत्रणासाठी तिन्ही जिल्ह्यात आपत्तकालीन व्यवस्था सज्ज आणि सतर्क केली आहे. पूर नियंत्रणासाठी लागणारी सर्व साधने आणि सुविधा प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून देण्याचे नियोजन झाले आहे.