Satara News : एनसीईआरटीच्या (NCERT) इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा (Maratha Empire) विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करत राज्यभरातून विरोधाचा आवाज उठवण्यात येत आहे. सुरुवातीला हिंदी भाषेतील पुस्तकातून हा नकाशा हटवण्यात आला होता. त्यानंतर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर (Education Minister Pankaj Bhoyar) यांनी या संदर्भात एनसीईआरटीसोबत पत्रव्यवहार करून योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे विधानमंडळात सांगितले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही दखल न घेता आता इंग्रजी भाषेतील पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, शिक्षण मंत्र्यांना एनसीईआरटीकडून अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या निर्णयाच्या निषेधार्थ साताऱ्यात (Satara News) शिवप्रेमींकडून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता साताऱ्यातील शिवतीर्थ येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, छत्रपती घराण्यातील वृषालीराजे भोसले या देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Raje Mudhoji Bhosle : राजस्थानमधील राजपूत घराण्यांच्या दबावाखाली ही कृती केल्याचा आरोप

दरम्यान, या विषयावर नागपूरच्या भोसले राजघराण्याचे वर्तमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी सुरवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत हे प्रकरण लावून धरलं आहे. एनसीईआरटीच्या आठवीतील इतिहासाच्या पुस्तकात असललेला वर्ष 1759 चा मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एनसीईआरटीने (NCERT) एकतर्फी हटवला, दरम्यान ही कृती राजस्थानमधील राजपूत घराण्यांच्या दबावाखाली केल्याचा आरोप मुधोजीराजे भोसले यांनी केलाय. पुस्तकातून हटवलेला तो नकाशा एनसीईआरटीच्या पुस्तकात पुन्हा प्रकाशित करण्यात यावा, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

नेमकंप्रकरणकाय? (NCERT Removed Maratha Empire Map)

1759 मधील मराठा साम्राज्याचा "कटक ते अटक" असा विस्तार दाखवणारा नकाशा एनसीईआरटीच्या आठव्या वर्गाच्या पुस्तकात छापण्यात आला होता. मात्र, तो नकाशा चुकीचा असून मराठ्यांचा राजस्थान मधील काही भागात अधिपत्य न होता असा आरोप करत राजस्थान मधील काही राजघराण्यांनी आणि राजपूत संघटनांनी तो नकाशा हटवण्याची मागणी केली होती. संबंधित नकाशा पुस्तकातून हटवण्यात यावा, या मागणीसाठी राजस्थानमधील काही राजघराण्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे मागणी लावून धरली होती. संपूर्ण वाद पाहता एनसीईआरटीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आठव्या वर्गाच्या पुस्तकातून संबंधित नकाशा हटवण्याचे ठरवत विद्यमान पुस्तकामध्ये तो नकाशा प्रकाशित केलेला नाही.

NCERT : एनएसयूआयचे राज्य सचिव म्हणाले, हाप्रकार दुर्दैवी..

एनएसयूआयचे मध्य प्रदेश राज्य सचिव विक्रांत सिंह परिहार म्हणाले की, एनसीईआरटीसारख्या राष्ट्रीय संस्थेने विश्वसनीय स्रोत आणि तज्ज्ञ समितीची मंजुरी न घेता इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात ऐतिहासिक नकाशा प्रकाशित करणे ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. ही केवळ नकाशातील चूक नसून, लाखो विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक ज्ञानात ढवळाढवळ आहे. ते म्हणाले की, इतिहास हा तथ्य आणि पुराव्यांवर आधारित असतो, सोयीवर किंवा विचारसरणीवर नाही. आमची मागणी आहे की, एनसीईआरटीने प्रकाशित केलेल्या सर्व ऐतिहासिक नकाशांचे स्वतंत्रपणे पुनरावलोकन केले जावे आणि त्यातील चुकीची माहिती तात्काळ दुरुस्त केली जावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना अचूक आणि अस्सल इतिहास शिकवता येईल.

 

इतर महत्वाच्या बातम्या

Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप