मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश धस यांचं सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. धस यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज ही घोषणा केली आहे.

सुरेश धस गटाची पंकजा मुंडेंना मदत
बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला केलेली मदत सुरेश धस यांना भोवली आहे. राष्ट्रवादी बहुमताजवळ होती, मात्र सुरेश धस गटाच्या पाच जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि इथे भाजपची सत्ता आली. शिवाय भाजपला शिवसंग्राम आणि शिवसेना आणि काँग्रेसच्या एका सदस्यानेही मदत केली.

बीडमधील पराभव अजित पवारांच्या जिव्हारी
पण हा पराभव अजित पवार यांच्या फारच जिव्हारी लागला होता. पक्षाच्या जीवावर आमदारकी, राज्यमंत्रिपद उपभोगल्यानंतरही पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल. अशा पक्षविरोधी कारवाया कदापि सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा पवार यांनी दिला आहे. त्यानुसार आज सुरेश धस यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

धनंजय मुंडेंचंही धस यांच्यावर टीकास्त्र
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या सुरेश धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपणा आहे. त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी कारवाई करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती.

संबंधित बातम्या

स्वतःच्या रक्ताचे झाले नाहीत, त्यांनी विश्वासघातकी म्हणू नये : धस

गद्दार सुरेश धस यांना धडा शिकवू : अजित पवार

सुरेश धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपणा, धनंजय मुंडेंची टीका

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या 5 सदस्यांचं भाजपला मतदान

तुमची झेडपी, तुमचा अध्यक्ष